शिक्रापूर । पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम समितीचे तसेच शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर, पुणे येथील बंगल्यांवर तसेच त्यांच्या नातेवाईक आणि जवळच्या सहकार्यांच्या घरावर आयकर विभागाने बुधवारी पहाटे 3 च्या सुमारास छापे टाकले. या प्रकारामुळे परिसरातील गडगंज लोकांचे धाबे दणाणाले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रीय झालेले आणि शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आपला दबदबा निर्माण करून थोड्याच दिवसात औद्योगिक वसाहतीत राजकारणामध्ये मोठा नेता बनलेले बांदल यांचे शिक्रापूर येथील बंगले, पुण्यातील महम्मदवाडी येथील एक बंगला तसेच बांदल यांचे नातेवाईक तसेच जवळच्या सहकार्यांच्या असे एकूण 8 ते 10 ठिकाणी बुधवारी आयकर विभागाने अचानक पोलीस बंदोबस्तात छापे टाकले. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. बांदल त्यांच्या राहणीमानामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. तसेच तालुक्यामध्ये लाखो रुपयांच्या आलिशान वाहनांची क्रेजदेखील या नेत्याने निर्माण केली आहे.
स्थानिक पोलिसांना डावलले
जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणावरही कारवाई करण्याआधी स्थानिक पोलिस ठाण्याच्या डायरीत नोंद करून विविध खाते व बाहेरील पोलिस कारवाई करत असतात. परंतु आयकर विभागाने मात्र पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस व स्थानिक पोलिसांवर विश्वास न ठेवता पुणे शहर पोलिसांच्या बंदुकधारी कर्मचार्यांच्या पथकासह या नेत्याच्या घरावर तसेच त्याचे नातेवाईक आणि जवळचे सहकारी यांच्या घरावर छापा टाकून कारवाई केली.