पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी नागरिक केवळ वेगवेगळ्या शंका आणि समस्यांबाबत विचारणा करीत आहे. नागरिकांकडून मान्यताप्राप्त आर्किटेक्ट, इंजिनिअर व सर्व्हेअरची चौकशी केली जात आहे. मात्र, नियमीतकरणाची प्रक्रिया सुरु करुन दहा दिवस होत आले. तरी, एकही अर्ज अद्यापपर्यंत दाखल करण्यात आलेला नाही. शहरातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि अर्जाचा नमुना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या 7 ऑक्टोबर 2017 च्या निर्णयानुसार 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहेत.
संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर अर्जाचे नमुने, आवश्यक कागदपत्रे, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, शासन निर्णय याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावरील ‘अनधिकृत बांधकामे नियमितीकरण’ या लिंकवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त 115 आर्किटेक्ट आणि 202 मान्यताप्राप्त इंजिनिअर व सर्व्हेअरची यादी पत्ते व मोबाईल क्रमांकांसह देण्यात आली आहे.
माहिती कक्ष तत्पर
बांधकाम परवाना विभागाचे सह शहर अभियंता अय्युबखान पठाण म्हणाले, अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. नागरिक विविध शंका व समस्यांबाबत महापालिका भवनातील बांधकाम परवाना विभागातील अधिकार्यांकडे चौकशी करीत आहेत. अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? किती शुल्क भरावे लागणार, आदींबाबत विचारणा केली जात आहे. नियमितीकरणाच्या प्रक्रियेला दहा दिवस होत आले असून एकही अर्ज दाखल केला गेला नाही.