जळगाव । सर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्ष 2016-17 मध्ये अंतर्गत करण्यात येणारे बांधकाम मार्च अखेर पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हात तीन ठिकाणी बांधकाम अपुर्ण असल्याने संबंधीत अभियंता शिंदे यांना नोटीस बजविण्यात आली आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत करण्यात येणारे बांधकाम अंतिम टप्प्यात असुन मार्च पर्यत हे कामे पुर्ण करण्यात येईल अशी माहिती अभियंता मृदुल अहिरराव यांनी दिली.
शिक्षण समितीची बैठक जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी गणवेश, शालेय पोषण आहार, शालेय आरोग्य तपासणीचा आढावा यावेळी घेण्यात आला. पुरक आहार मानधन कोषागार कार्यालयात जमा असुन 28 जानेवारी पर्यत ही रक्कम मुख्याध्यापकाच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. सर्वशिक्षा अभियानाची निधी जिल्हास्तरावरुन तालुकास्तरावर वर्ग झाल्यानंतर तो वितरीत होत नाही त्यामुळे कामात दिरंगाई होते यात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केली. सभेस जिल्हा परिषद सदस्य लिलाबाई सोनवणे, समाधान पाटील, हेमांगीनी तराळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड, संदिप पाटील, सर्व गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधिक्षक उपस्थित होते.