अनेकांनी घेतला सरकारी योजनेचा लाभ
पिंपरी : महाराष्ट्र मजदूर संघटनेने पाठपुरावा करुन शेकडो नोंदीत बांधकाम कामगारांना बांधकाम अवजारे खरेदीसाठी मिळणार्या पाच हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळवून दिला. सरकार राबवित असलेल्या बांधकाम कामगारांच्या अनेक योजनांपैकी ही एक योजना आहे. यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी कामगारांना कल्याणकारी मंडळाकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या कार्यालयात शुक्रवारी बांधकाम कामगार मजुरांची सभा पार पडली. यावेळी साद फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष किसन बावकर, सचिव प्रवीण जाधव, बांधकाम कामगार विभागाच्या अध्यक्षा उज्वला गर्जे, प्रितेश शिंदे, नागेश वनवटे, ओंकार माने, श्याम सुळके, समर्थ नाईकवडे आणि कामगार पांडुरंग सावंत, अतुल धवारे, बिरु क्षीरसागर, अमर ढाके, भिकाजी वाळके, समीर शिरसाठ यांच्यासग शेकडो कामगार उपस्थित होते.
सरकारी योजनांचा लाभ
यावेळी बोलताना इरफान सय्यद म्हणाले की, कामगारांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नावनोंदणी करावी. सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. बांधकाम कामागारांच्या कल्याणाकरीता हजारो कोटी रुपये शासनाच्या बांधकाम मंडळात असतात. परंतु, कामगारांना लाभ मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसून येत नाही. त्यामुळे बांधकाम कामगारा लाभापासून वंचित आहे.
जिल्हा मंडळे उभारल्ययास फायदा
माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण या मंडळाप्रमाणेच जिल्हानिहाय बांधकाम कामगार मंडळे उभारली गेली पाहिजेत. तेव्हाच बांधकाम कामगार खर्या अर्थाने या योजनांचा लाभ घेऊ शकतात. या योजनांचा लाभ मिळाल्यास बांधकाम कामगारांचे प्रश्न वेळीच मार्गी लागतील. त्याबाबत महाराष्ट्र मजदूर संघटना राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचेही सय्यद म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र मजदूर संघटना व साद सोशल फाऊंडेशनच्यावतीने डॉ. महेश शेटे व दत्ता उदागे यांनी बांधकाम कामगारांना व्यसनमुक्ती समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र मजदूर संघटना व साद सोशल फाऊंडेशनतर्फे लवकरच व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती, उज्वला गर्जे यांनी दिली.