Govt lost revenue by disrespecting the constructed Area : Crime Against Seven People In Savada सावदा : फैजपूर येथील एका संस्थेतील कर्जदार व्यक्तीची बांधकाम झालेली जागा बखळ असल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवत खरेदी केल्याप्रकरणी सावदा पोलिसात सात जणांविरोधात दुय्यम निबंधक यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
बांधकाम झाले असतानाही दाखवली बखळ जागा
सावद्यातील दुय्यम निबंधक प्रशांत विलासराव कुलकर्णी (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फैजपूर विविध कार्यकारी सोसायटी लि. ठेव संकलन कर्जवाटप विभाग लि.फैजपूरतर्फे शासनमान्य विशेष वसुली अधिकारी भगवंत लक्ष्मण पाटील, चेअरमन सुमाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या आमोदेतर्फे अनिल विनायक पाटील (आमोदे), जितेंद्र प्रकाश पवार (सावदा, मयत), कविता जितेंद्र पवार (सावदा, वारस), युगंधर जितेंद्र पवार (दोघे रा.सावदा, वारस), अमिता हेमराज चौधरी (फैजपूर), नितीन चंद्रकांत पाटील (फैजपूर) यांनी सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ८ जुलै २०१३ तसेच ७ मार्च २०१९ व १७ जानेवारी २०२२ रोजी बांधकाम झालेली जागा बखळ असल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवला.
संगनमत करीत केली फसवणूक
दुय्यम निबंधक प्रशांत विलासराव कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीचा आशय असा की, फैजपूर नगरपालिका हद्दीतील गट नं. १४४४ मधील प्लॉट नं.०६ व ११ ही मालमत्ता फैजपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादीत फैजपूर या संस्थेचे कर्जदार युवराज सुदाम तळेले (फैजपूर) यांच्याकडे पतसंस्थेची कर्जाची थकबाकी वाढल्याने संस्थेने ही जागा लिलावामार्फत जप्त केली मात्र या मालमत्तेवर बांधकाम झालेले असतांना देखील ती बखळ जागा असल्याचे दर्शवून यातील आरोपी अनिल पाटील यांना लिलाव पद्धतीने विक्री करण्यात आली. या व्यवहाराचा दुय्यम निबंधक कार्यालय, सावदा येथे ०८ जुलै २०१३ रोजी नोंदणी पद्धतीने कायम खरेदी करून देण्यात आली तसेच तीच मालमत्ता यातील अनिल पाटील यांनी जितेंद्र पवार यांना ७ मार्च २०१९ रोजी नोंदणी पद्धतीने कायम खरेदी करून देण्यात आली मात्र अनिल पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे वारस जितेंद्र पवार व कविता जितेंद्र पवार यांनी ही मालमत्ता ही बांधीव असताना बखळ असल्याचे दर्शवून यातील अमिता हेमराज चौधरी (फैजपूर) व नितीन चंद्रकांत पाटील (फैजपूर) यांना १७ जानेवारी २०२२ रोजी नोंदणी पद्धतीने कायम खरेदी करून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार उस्मान तडवी, हवालदार संजय चौधरी, उमेश पाटील करीत आहे.