बांधकाम विभागातील अन्य गैरप्रकरणात कारवाई कधी?

0

मनोरा भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईनंतर आता अन्य प्रकरणांकडे लक्ष

मुंबई:- मनोरा आमदार निवास गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागातील समोर आलेल्या इतर घोटाळ्यांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांनी मनोरा आमदार निवास गैरव्यवहार प्रकरणी जुलै २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मनोरा आमदार निवास घोटाळाप्रकरणी कारवाई झाल्यानंतर आता मंत्रालयातील पेव्हर ब्लॉक, उंदीर गैरव्यवहार तसेच दक्षिण मुंबईतील विविध कामात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कधी कारवाई होणार याबाबत उत्सुकता आहे.

आमदारांचे वास्तव्य असलेल्या मनोरा आमदार निवासातील आमदारांच्या सदनिकांमध्ये वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभालीची कामं होत असतात. भाजपाचे तुमसर येथील आमदार चरण वाघमारे यांच्या सदनिकेतही अशाप्रकारे दुरुस्ती झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. न झालेली कामं कागदोपत्री झाल्याचे दाखवून अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांच्या संगनमताने बिले काढून रक्कम लाटल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी जुलै २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, याप्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर यात दोषी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, शाखा अभियंता केशव धोंडगे आणि उप अभियंता भूषणकुमार भेडगे यांना सरकारने निलंबित केले आहे.

दुसरीकडे भाजपाचेच आमदार प्रशांत बंब यांनीही दक्षिण मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील असाच गैरव्यवहार समोर आणला आहे. याप्रकरणात तर २२ अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. मात्र त्याबाबत कोणत्याही हालचाली अद्याप झालेली नाही. मंत्रालयातील पेव्हर ब्लॉक बसवण्यात झालेला गैरव्यवहार, त्याचप्रमाणे उंदीर प्रकरणही चरण वाघमारे यांनी ठोस कागदपत्रांच्या आधारे समोर आणले आहे. याप्रकरणात अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही अथवा चौकशीही सुरू झालेली नाही.

कागदोपत्री कामे दाखवून गैरव्यवहार
कागदोपत्री कामे झालेली दाखवायची मात्र प्रत्यक्ष कामे करायची नाहीत आणि पैसे लाटायचे हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागात सर्रास सुरू आहे. अधिकारी या गैरव्यवहाराला इतके सरसावले आहेत की मंत्रालय आणि आमदार निवासातही असा गैरप्रकार करण्याची हिंमत ते करू शकतात. सरकारने अशा अधिकाऱ्यांवर योग्य वेळी कारवाई केली नाही तर हा प्रकार थांबणार तर नाहीच उलट या भ्रष्ट अधिकाऱ्यांची हिंमत आणखी वाढेल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.