बांधकाम व्यावसायिकाला मारहाण करतांना ललीत कोल्हेंसह संशयित सीसीटीव्हीत कैद

0

पोलिसांनी जप्त केला सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर बॉक्स जप्त

जळगाव – बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना मारहाण केल्यानंतर संशयितांनी गोरजाबाई जिमखान्याचा सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर बॉक्स काढून नेला होता. व याच परिसरातील झाडाझुडपांमध्ये फेकून पळ काढला होता. शहर पोलिसांनी शुक्रवारी हा डीव्हीआर बॉक्स हस्तगत केला आहे. त्यात मारहाणीचा प्रकार कैद झाला असून माजी महापौर ललीत कोल्हे यांच्यासह मारहाण करणारे स्पष्टपणे दिसून येत आहेत, अशी माहिती तपासधिकारी तथा पोलीस निरिक्षक अरुण निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. या गुन्ह्याच्या तपासात हा सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा हा पुरावा महत्वाचा ठरणार असून कोल्हे यांच्यासह संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राणघातक हल्लयासह खंडणीचा गुन्हा

शहरातील व.वा.वाचनालयाजवळील गोरजाबाई जिमखाना आवारात तसेच जिमखान्यात बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय 51 रा. बी.20, टी.एम.नगर, सिंधी कॉलनी) यांच्यावर प्राणघातक हल्लयाप्रकरणी माजी महापौर ललीत कोल्हे यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात जखमी खुबचंद साहित्या यांनी दिलेल्या जबाबावरुन प्राणघातक हल्ला, माहराण शिवीगाळ, दमदाटी, खंडणी, दंगलीसह आर्मअक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारहाणीत तोंडावर जखमा झाल्या असल्याने तसेच मारहाणीत खाली पडल्याने डोक्याला दुखापत झाली असून जखमी खुबचंद साहित्या यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे फिर्यादीत ?

पोलिसात दिलेल्या फिर्यादीत खुबचंद साहीत्या यांनी म्हटले आहे की, व.वा. वाचनाजवळील गोरजाबाई जिमखाना बाहेर लाकडी बाकड्यावर एकटा बसलेला होतो. तेव्हा ललीत कोल्हे व राकेश (पूर्ण नाव माहीत नाही) व त्यांचे सोबत 5/5 व्यक्ती आलेत. यावेळी ललीत कोल्हे यांचे हातात रिव्हॉल्वर होती. त्यांच्यासह इतरांनी समोर येताच मला लाथाबुक्यांनी चेहर्‍यावर, तोंडावर, ओठावर, उजव्या डोक्यावर जीवे मारण्याच्या उद्देशानेच मारहाण केली असल्याचे खुबचंद साहित्या यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तसेच ललित कोल्हे यांच्याविरुध्द पूर्वी पोलिस अधिक्षकांकडे तिनवेळा अर्जाद्वारे तक्रार केली आहे. कारण ललित कोल्हे यांनी माझ्या मुलाच्या नावावर असलेली कार देखील नेली असून परत देत नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गाडीची मागणी केली असता, शिवीगाळ व दमदाटी केली आहे. तसेच ललित कोल्हे आमचे व्यापार्‍याचे बिल्डींग बुक करुन पैसे घेवून जातात व नेहमी मला खंडणी मागत असतात. त्यांना विरोध केल्यानेच त्यांनी हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.