बांधकाम समिती खातेवाटप नियमबाह्य झाल्याने रद्द होण्याच्या मार्गावर?

0

जळगाव। जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर तब्बल महिन्याभरानंतर विविध विषय समिती सदस्यांची नेमणुक करुन खातेवाटप करण्यात आले. 1 एप्रिल रोजी झालेल्या सभेत सभापती निवड करण्यात आली. त्यानंतर 2 में रोजी विषय समिती खातेवाटप व सदस्य नेमणुक करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील खातेवाटपात महिला व बालकल्याण समिती सभापती पद रजन चव्हाण यांना देण्यात आले. पुन्हा त्यांच्याचकडे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून उपाध्यक्ष यांच्याकडे असलेली बांधकाम समिती सभापतीपद देण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 83(3) अन्वये अगोदर खातेवाटप झालेल्या सभापतीकडे पुन्हा खातेवाटप करता येत नाही. अधिनियमान्वये जिल्हा परिषद बांधकाम समिती निवड नियमबाह्य झाल्याचे अभिप्राय सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ तथा सभागृहाचे सदस्य सचिव नंदकुमार वाणी यांनी दिला आहे. अध्यक्षांनी इतिवृत्त मंजुर केले असून हे इतिवृत्त सीईओ यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. दोन दिवसात सीईओ इतिवृत्ताचे अवलोकन करुन अंतिम निर्णय देतील. दरम्यान अधिनियमान्वये समिती निवड नियमबाह्य झाल्याने बांधकाम समिती रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

अधिनियम काय सांगतो
अधिनियम 1961 च्या 83 (3) नुसार समाजकल्याण सभापतीपद व महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद हे दोन्ही वेगळे आहे. महिला बालकल्याण समितीला बांधकाम समिती सभापती पद जोडता येत नाही. समाज कल्याण व बाल कल्याण या दोन समित्या दोन सभापतींकडे असाव्यात. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धशाळा या समित्या एकाच सभापतीकडे असाव्यात. तर उर्वरित म्हणजेच बांधकाम, अर्थ, शिक्षण व आरोग्य या चार समित्या दोन सभापतींकडे असाव्यात, असे अधिनियममध्ये नमूद आहे.

जि.पच्या सभापती खातेवाटप व सदस्य निवडीची सभा झाल्यानंतर त्या सभेच्या ईतीवृत्तावर सचिवांनी अभिप्राय नोंदविला आहे. आता हे इतिवृत्त सीईओंकडे सादर करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसापुर्वीच सीईओंनी इतीवृत्ताचे अवलोकन करून नियमात नसल्यास पुढील कार्यवाही केली जाईल,असे सांगितले आहे. आक्षेप असल्याने सीईओं विषय समित्यांच्या खातेवाटपाबाबत कारवाई करून विखंडणाचा ठराव आयुक्तांकडे पाठविण्याची शक्यता आहे. अन्यथा प्रशासनासाठी हा विषय डोकेदुखी ठरु शकतो. महिन्या भरानंतर झालेली विषय समिती जर विखंडीत झाली तर भाजपासाठी मनस्ताप ठरु शकते.

उपाध्यक्ष फक्त नामधारी
जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे मागील दहा ते पंधरा वर्षापासून बांधकाम व अर्थ समिती सभापती देण्यात येत होते. ही प्रथा यंदा मोडीत निघाली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व माजी बांधकाम अभियंता जे.के.चव्हाण यांच्या पत्नी रजनी चव्हाण यांच्याकडे बांधकाम तर महाजन यांचे दुसरे निकटवर्तीय पोपट भोळे यांच्याकडे अर्थ समिती सभापती पद देण्यात आले. दोन्ही महत्वर्णू समिती उपाध्यक्षांकडून काढून घेण्यात आल्याने सध्याचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन हे नामधारी बनले आहे.