जळगाव । जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापतीपद हे महिला व बालकल्याण समिती सभापती असलेल्या रजनी चव्हाण यांच्याकडे देण्यात आले आहे. दोन्ही खाते त्यांच्याकडे असल्याने महिला व बालकल्याण विभागाच्या दालना व्यतिरिक्त बांधकाम समिती सभापतीचे नवे दालन पशु संवर्धन विभागाशेजारी तयार करण्यात येत आहे. नवीन दालनाचे बांधकाम सध्या सुरु आहे. दोन्ही विभागाचे सभापती एकच असतांना अतिरिक्त खर्च करण्यात येत असल्याने भाजपाचे मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओ यांच्याकडे बांधकाम समिती सभापतीच्या दालनाचे कामकाज थांबविण्याबाबत तक्रार केली होती. सीईओंनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने बोदडे यांनी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. नवीन दालनाबाबत तोडफोड करण्यास व नवीन दालन तयार करण्यास कोणाची परवानगी घेतली, दालनाचे काम हे कुठल्या निधीतून करण्यात येत आहे व काम कोणत्या एजन्सीबाबत करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी मागविली आहे.