बांधकाम साईटवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू

0
आळंदी : बांधकाम साईटवर पहाड बांधण्याचे काम करणारा कामगार ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खाली पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयादात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 23 सप्टेंबर रोजी घडली. राजेंद्र आक्काप्पा कोणकेरी (वय 39, रा. राजगुरूनगर, खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रमोद विद्याधर पन्नीकर (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), राजू शिंदे (रा. देहू फाटा, आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप काशिनाथ मानवतकर (वय 25) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी वडगाव रस्त्यावर गोशाळेच्या आवारात एक नवीन इमारत बांधण्यात आली आहे. त्या ईमातारीमध्ये शौचालयाचे काम करण्यासाठी पहाड बांधण्याचे काम सुरु होते. 20 सप्टेंबर रोजी पहाड बांधत असताना दिलीप 20 फूट उंचीवरून खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ उपचारासाठी दिलीप याला पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान 23 सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. यावरून संबंधित ठेकेदाराविरोधात कामगारांना सुरक्षेची साधने न पुरविल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.