बांबरूड खु. च्या शाळेत शिक्षकांचे वर्गातच सिगारेटचे झुरके

0

विविध समस्यांविरोधात विद्यार्थ्यांचा शाळेवरच बहिष्कार

पाचोरा– पाचोरा तालुक्यातील बांबरूड खुर्द(महादेवाचे)येथील माध्यमिक शाळेत कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाहीत, वारंवार शिक्षक बदलणे, शिक्षकांचे वर्गातच धूम्रपान करणे, पिण्याची पाण्याची दुर्दशा, घाणमिश्रित नित्कृष्ठ दर्जाचा शालेय पोषण आहार, शौचालयाची पुरेशी सोय नसणे, प्रयोगशाळा व ग्रंथालय नसणे आधी असुविधांना कंटाळून विद्यार्थ्यांनी व पालकांनी व गावकर्‍यांनीच चक्क गावात दवंडी देत शाळेवर गेल्या दोन दिवसांपासून बहिष्कार घालत विद्यार्थ्यांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय घेतला असून ही दुर्दैवी घटना पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द (महादेवाचे )या गावी घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द( महादेवाचे ) हे सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव असून येथे कै. पुंडलिक काळू पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांची इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असलेली सुमारे 300 विद्यार्थी शिकत असलेली खाजगी शाळा स्थलांतरित झालेली आहे. सन 2017- 18 मध्ये ही शाळा भडगाव तालुक्यातून पाचोरा तालुक्यात स्थलांतरित झाली आहे. मात्र शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा शाळेत उपलब्ध करून दिलेल्या नसल्याच्या तक्रारी करत गावातील पालकांनी गावात दवंडी देत आपली पाल्ये शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेऊन दि.20 सप्टेंबरपासून शाळेवर बहिष्कार घातला आहे. याबाबत पालकांनी व विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी केल्या आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा तोंडावर असताना या शाळेत अद्याप पर्यंतही प्रयोगशाळा व ग्रंथालयच नाही. पिण्याच्या पाण्याची टाकी नसून तात्पुरती व्यवस्था केलेल्या प्लास्टिक टाकीत पूर्णपणे शेवाळ झाले आहे. अस्वच्छ पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी मिळत आहे. तर विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी वेगवेगळी प्रसाधन गृहे नसून तात्पुरता आडोसा असलेल्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे झाली आहेत, शाळा खोल्यात पूर्ण कचरा असून कोणतीही स्वच्छता होत नाही. अशा अनेक कारणांनी कंटाळून पालकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार घातला आहे. तर विषय शिक्षक नियमित येत नाहीत बाहेरगावहुन येत असलेल्या ये-जा करणार्‍या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता दहावीच्या वर्गात एकूण 35 विद्यार्थी असल्याची नोंद असून प्रत्यक्षात केवळ एकच विद्यार्थी नियमित असून या विद्यार्थ्याने देखील मला नववीच्या वर्गाचा अभ्यास शिकवला जात असल्याची माहिती दिली. तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्गातच धूम्रपान करतात, तासन्तास मोबाईलवर बोलत वेळ वाया घालवतात. मात्र आम्हाला शिकवले जात नसल्याच्या गंभीर तक्रारी केल्या आहेत.

शाळा व्यवस्थापनाचे कानावर हात

शाळेचे चेअरमन भय्यासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी आपण मंत्रालयात कामानिमित्त आलो असल्याचे सांगत नंतर प्रतिक्रिया देतो असे सांगितले. तर मुख्याध्यापक योगेश बाविस्कर यांनी या सर्व असुविधेबद्दल शाळा व्यवस्थापनाला कळवले असून आठ दिवसात सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी माहिती दिली. दरम्यान शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी आशा पालकांनी व्यक्त केली आहे. तर शाळेचे चेअरमन स्वतः येऊन समस्यांची सोडवणूक करत नाहीत तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नसल्याची भूमिका पालकांनी व गावकर्‍यांनी घेतली आहे. विठ्ठल राजपूत, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, गोपाल पाटील, गंगाराम पाटील असे यांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.

शाळेवर विद्यार्थी व पालकांचा बहिष्कार असल्याचे कळाल्याने शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांना तपासणी साठी पाठवले असून त्यांचा तपासणी अहवाल आल्यावर योग्य त्या कार्यवाहीसाठी शिक्षणाधिकारी यांना शिफारस केली जाईल
विकास पाटील -गट शिक्षण अधिकारी ,पंचायत समिती पाचोरा