बांबरूड राणीचे परीसरात केळीचे नुकसान

0

पाचोरा। ता लुक्यातील बांबरुड राणीचे परिसरात सुमारे दीड तास सुसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्याने शेतकर्‍यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गावात 20 घरांची पडझड होवून अनेक घरांच्या छतावरील पत्रे उडाली तर वीज वितरण कंपनीचे 70 खांब पडल्याने गेल्या 12 तापापासून गावात व परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या तीन वर्षापासून सतत बांबरुड परिसरात अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांचे नुकसान होत असूनही भरपाई न मिळाल्याने शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे परीसरात चिंतेचे वातावरण
तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे 5 रोजी रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वार्‍यासह दिडतास वादळी पाऊस झाला या पावसामुळे परिसरातील शेतीच्या बागा कोलमडल्या. गेल्या तीन वर्षापासून सतत बांबरुड परिसरात अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांचे नुकसान होत असूनही भरपाई न मिळाल्याने शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. त्यात पुन्हा यावर्षी तीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. 5 रोजी इतक्या जोरात सुसाट्याचा वारा होती की, या वार्‍यामुळे 70 वीजेचे खांब पडून गावातील 20 घरांचे नुकसान झाले. वीज वितरण कंपनीतर्फे तातडीने वीजेचे खांब पुर्ववत रोवण्याचे काम सुरु झाले आहे. नागरिकांच्या घरांच्या पडझळीमुळे युसुफ मेवाती, नामदेव पाटील हे दोन शेतकरी जखमी झाले असून तीन म्हशी, दोन बैल, तीन गाईंच्या अंगावर पत्रे पडल्याने आठ गुरु जखमी झाले आहे.

पंचनामांच्या कामास सुरूवात
महसूल व कृषी विभागातर्फे संयुक्त पंचनामे सुरु- बांबरुड राणीचे येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांची पडझड व केळीच्या बागा आडव्या झाल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी आर.एस.मोरे, तलाठी बी.व्ही.गायकवाड, कृषी विभागाचे चेतन बागुल व स्नेहल पटवर्धन यांनी संयुक्त पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तर वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी तातडीने विजेचे खांब उभे करुन तारा ओढण्याचे काम लवकरच करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

यांनी घटनास्थळी जाऊन दिली भेट
बांबरुड गाव व शिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ, तहसीलदार बी.ए.कापसे, पं.सं.चे माजी सभापती रविंद्र पाटील, जि.प.सदस्य पद्दमसिंह पाटील, पं.स.सदस्य ललित वाघ, सरपंच राजेंद्र वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व कृषी विभागाचे अधिकार्‍यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कर्मचार्‍यांनी पंचनामा करण्याच्या हालचाली सुरु केल्या.

भडगावात पावसाचा फटका
वादळी वार्‍यामुळे भडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी घराची पत्रे उडाल्याची घटना घडली. शहरातील दिनकर पाटील व शंकर पाटील यांनी दोन्ही भावडांच्या घराचे पत्रे उडाल्याने उडाल्याने दोघांचे संसार उघड्यावर आले आहेत. वार्‍यामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या चिंतत भर पडली आहे.