बांभोरीच्या ठेक्यात प्रचंड अनियमीतता

0

तस्करांकडुन अधिकार्‍यांचा पाठलाग : कारवाईसाठी तहसीलदारांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

जळगाव – शहरासह जिल्ह्यात होणार्‍या वाळुच्या अवैध वाहतुकीचा काल स्फोट झाला. या अवैध वाळु वाहतुकीने दोन बळी घेतले. ही घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडुन जागे झाले. तहसीलदार वैशाली हिंगे यांनी बांभोरी येथील वाळु साठ्याच्या ठेक्यात मोठ्या प्रमाणावर अनियमीतता असल्याचा गंभीर ठपका ठेऊन तस्करांकडुन कारवाईला गेलेल्या अधिकार्‍यांचाही पाठलाग होत असल्याचे पत्रच तहसीलदार वैशाली हिंगे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आपल्या स्तरावरून कारवाई करावी असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान काल जप्त केलेल्या चार वाहनचालकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जिल्ह्यात वाळु वाहतुकीला बंदी असतांनाही सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतुक केली जात आहे. या अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेमण्यात आलेली पथके देखिल हतबल ठरत आहे. काल दि. 16 रोजी या अवैध वाहतुकीने दोन जणांचा बळी घेतला. तर शहरातील प्रसिध्द डॉ. वर्षा पाटील यांच्या वाहनालाही एका डंपरने मागून धडक दिली. यासंदर्भात माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली. काल तातडीने वाळुची अवैध वाहतुक करणारी चार वाहने महसूलच्या पथकांनी जप्त केली. महसुलच्या पथकाने एमपी-38- जी- 0390, एमएच-19 झेड- 5417, एमएच-28 एबी- 7708, एमएच-19- 1371 अशा जप्त केलेल्या वाहनांना तहसीलदार वैशाली हिंगे यांनी नोटीस बजावली आहे.

बांभोरीच्या ठेक्याबाबत अनेक तक्रारी

तहसीलदार वैशाली हिंगे यांनी जिल्हाधिकार्‍यांना बांभोरी येथील ठेक्यासंदर्भात कारवाईचे पत्र दिले आहे. या पत्रात अत्यंत गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. गौणखनिज वाहतुक करीत असतांना बांभोरी ता.धरणगांव येथील वाळ साठयाच्या ठेक्यावरील एकुण 4 वाहने मिळून आलेली असुन सदरील वाहने जप्त करून मा.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहे. वाहन चालकांकडील परवाना पावत्यांची महामाईनिंग अ‍ॅपवर पडताळणी केली असता सदरील पावत्या ह्या अवैध असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधितांना दंडात्मक कार्यवाहीची नोटीस इकडील कार्यालयामार्फत काढण्यात येत असुन संबंधित वाळु वाहतुकी संदर्भात अतिशय मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत मौजे बांभोरी येथील देण्यात आलेल्या वाळ ठेक्यामध्ये याप्रमाणे अनियमितता असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अवैध गौणखनिज बाबत कारवाई साठी जात असतांना वाळ तस्कर यांचे लोक सदरील पथकाच्या मागे मागे येऊन चोरी करणारे वाळु वाहने पळवून लावतात त्यामुळे सदरील वाहने पकडण्यात अडचण निर्माण होत आहे व सतत अधिकारी व कर्मचारी याचा पाठलाग करतात. संबंधित वाळु साठा हा बांभोरी ता.धरणगांव येथे असुन परंतु सदरील ठेकेदार हे अनेक ठिकाणाहुन अवैधरित्या वाहतुक करीत असल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त झालेल्या आहे. या ठिकाणच्या ठेक्यावरील वाळुची वाहतुक करणारे वाहन क्रमांक एमएच- 19 सीवाय-7557 याची धडक बसुन काल दिनांक 16 रोजी मौजे कुसुंबा येथे एका माणसाचा मुत्यू झालेला आहे व नशिराबाद रोडवर वाहन क्रमांक एमएच- 04 सीपी-9398 च्या धडकेने एका डॉक्टरांच्या वाहनाला धडक दिल्याचे दिसुन आले आहे. तरी संबंधितावर आपले स्तरावरून कारवाई करण्यात यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आरटीओकडून 23 वाहनांवर कारवाई

वाळूच्या अवैध वाहतुकीसंदर्भात वाहनांची मुदत, स्पीट कंट्रोल, फिटनेस, टेल लॅम्प, रेडीअम, क्रमांक या गोष्टी अनिवार्य आहे. मात्र वाळुची वाहतुक करणार्‍या वाहनांना यातील कुठल्याही गोष्टीचे सोयरे सुतक नसल्याचे दिसून येत आहे. कालच्या घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या आदेशानुसार 23 वाहनांवर कारवाई करण्यात आली असुन त्यापैकी 14 वाहने जप्त करून ती कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहे. शहरात स्पीड कंट्रोलसंदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना सांगितले. कारवाईची मोहीम ही सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले.