बांभोरी ते निमखेडीच्या दरम्यान गिरणेवर होणार 40 कोटींचा समांतर बंधारेवजा पुल !

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा : आता निधीसाठी लक्ष अर्थसंकल्पाकडे

जळगाव – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी, यातून होणारे अपघात आणि एकंदरीतच त्रास दूर व्हावा यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने बांभोरी ते निमखेडीच्या दरम्यान गिरणा नदीवर 40 कोटी निधीचा बंधारायुक्त समांतर पूल बांधण्याचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनीक बांधकाम खात्याच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पुलासाठी आगामी अर्थसंकल्पात तब्बल 40 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिली असल्याने याबाबत बजेटमध्ये निधी मिळू शकतो. परिणामी आता सर्वांचेच लक्ष बजेटकडे लागलेले आहे. तर, वाहतुकीच्या समस्येसह गिरणा नदीवरील पाण्याची साठवणूक होणार असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी भगिरथ प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे
 
11 रोजी होणाऱ्या बजेट कडे जिल्हावासींचे लक्ष
 
सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर जळगाव शहर ते बांभोरी गाव यांना जोडणारा गिरणा नदीवर एकच पूल आहे. दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे विस्तारीकरण झाले असले तरी पुल हा अरूंद असल्याने येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे येथे नवीन पूल हवा ही मागणी कधीपासूनच करण्यात येत आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या पुलासोबत बंधारादेखील हवा अशी संकल्पना मांडली. यातून गिरणेवर बंधारायुक्त पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव तो निबंध सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती रूपा गिरासे -राऊळ , उपअभियंता सुभाष राऊत् व का. या. श्री येळाई यांनी शासनाकडे सादर केलेला असून हा पूल मंजूरीसाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला असून याच्या निधीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि यांच्याकडे बैठकी घेतल्या आहेत. यात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष दि. 11 रोजी होणाऱ्या घोषित बजेटकडे लागले आहे.
वाळू उत्खननाला बसणार आळा
गिरणा नदीवरील हा नवीन पूल बांभोरी गाव आणि निमखेडी परिसर यांना जोडणार आहे. यामुळे जुन्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. परिणामी येथील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळेल. यासोबत, बांभोरी आणि निमखेडी परिसरातील लोकांना मुख्य पुलावर न येता सुरक्षितपणे गिरणा नदी पार करता येईल. या पुलावरून परिसरातील नागरिक आणि विशेष करून विद्यापीठातील विद्यार्थी, शेतकरी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असून या नवीन पुलामुळे त्यांना सुरक्षितता मिळणार आहे. विद्यापीठासह परिसराला नेहमी पाण्याची समस्या भेडसावत असते. या पार्श्वभूमिवर, गिरणा नदीत वाहून जाणारे पाणी साठविण्यात आल्याने विद्यापीठासह परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. गिरणा नदीच्या खालील भागात एकही बंधारा नसल्यामुळे येथून वाहून जाणारे पाणी येथे साठविले जाणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे कायम पाणीसाठा असल्याने या परिसरातून होणार्या वाळू उत्खननाला आळा बसणार आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दूरदृष्टीकोन आणि भगिरथ प्रयत्नांमुळे गिरणा नदीवरील बंधारायुक्त पुलामुळे वाहतुकीच्या सुविधेसह जलसंचय देखील होणार असून हा या भागातील मोठा व महत्वाचा असा प्रकल्प ठरणार आहे. यामुळे आता बजेटमध्ये यासाठी तरतूद करण्यात येईल या अपेक्षेसह लोकांना याची उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.