कोथरूड । सर्व बागा सुस्थितीत राखणे व त्यांची उत्तम निगा राखणे हे शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, शहीद ताथवडे उद्यानात विविध विकास कामे केली जात आहेत, हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांनी काढले.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी विकासनिधीतून शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानात स्प्रिंकलर बसविणे व अन्य विकास कामांच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी अभिषेकी बोलत होते. बापू घाटपांडे, भैय्यासाहेब रुईकर, पांडुरंग तावरे, सुनील नखाते, वनिता ताथवडे, नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, प्रशांत हरसुले, बापूसाहेब मेंगडे, बाळासाहेब धनवे, राजेंद्र येडे, राज तांबोळी, अॅड. प्राची बगाटे, सुधीर फाटक, सुशीला साठे, सतीश मोहिते, निलेश गरुडकर, नारायण वायदंडे, छाया सोनावणे, जगदीश डिंगरे आदी उपस्थित होते.
पं. जितेंद्र अभिषेकी उद्यान खुले करावे
अभिषकी म्हणाले, या बागेच्या उद्घाटन समारंभासही हजर होतो आणि आज यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे याचा आनंद वाटतो. आता सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन माझ्या वडिलांच्या नावावर असलेले उद्यान खुले करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या सूचनांनुसारच कामे
खर्डेकर म्हणाल्या, बागेत येणारे नागरिक विविध सूचना करत असतात, त्या सूचनांनुसारच मी निधीमध्ये तरतुदी केली. कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते होत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. या बागेचे उद्घाटन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या जयंतीदिनी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन विकासनिधीतून होत आहे, याचा मला अभिमान वाटतो असेही त्या म्हणाल्या.
विकासासाठी कटिबद्ध
भाजपचे शहरउपाध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले आमच्या नगरसेवकांनी चांगले काम केले तर त्यांचे कौतुक करा. पुणेकरांनी बहुमत दिले आहे त्याचा मान राखून शहर विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बापूसाहेब घाटपांडे व भैय्यासाहेब रुईकर यांनी प्रभागातील चार ही नगरसेवक उत्तम समन्वय राखत चांगले काम करत असल्याचे सांगितले. गार्डन ग्रुपच्या वतीने सुनील नखाते यांनी नागरिकांच्या विविध कामांच्या अपेक्षांबद्दलची माहिती दिली. पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान ही लवकरच नागरिकांसाठी खुले होईल असे वचन नगरसेवक जयंत भावे, दीपक पोटे यांनी दिले.