देहूरोड : स्वच्छता अभियानसाठी लाखोंचा पाण्यासारखा खर्च करूनही कॅन्टोन्मेंट हद्दीत नागरिकांकडून सहकार्य होत नसल्याचे समोर आले आहे. बाजारपेठेत सर्रासपणे व्यापार्यांकडुन दिवसभरात गोळा झालेला कचरा थेट रस्त्यावर फेकला जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बोर्डाचे विद्यमान उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, अशा बेजबाबदार व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करता येईल का? याबाबत विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
शिस्त पाळण्याची गरज
देहूरोड बाजारपेठेतील अनेक व्यापारी विशेषतः कापड, रेडिमेडस्, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स् आणि बेकरी व्यवसाय करणार्या व्यापार्यांकडून रात्री थेट रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. बाजारपेठेत एकही कचराकुंडी नसल्यामुळे कचरा दुकानासमोर रस्त्यावर फेकावा लागतो, अशी सबब या व्यापार्यांकडून सांगितली जात आहे. तर दुसरीकडे कचरा वर्गीकरण करून तो दुकानातच गोळा करण्यासाठी सुमारे दहा किलो क्षमतेचे प्लॅस्टिकचे कचरा डब्बे बोर्डाकडूनच या व्यापार्यांना तसेच शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना देण्यात आले असल्याची माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी दिली. खंडेलवाल हे स्वतः व्यापारी असल्यामुळे व्यापारी बांधवांनी शिस्त पाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, सुविधा पुरवूनही व्यापार्यांकडून त्याचा वापर केला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. चार महिन्यांपुर्वीच बोर्डाच्या माध्यमातून स्वतः प्रत्येक दुकानात जाऊन कचरा डबे वितरीत केले होते, मात्र आता एकाही दुकानदाराकडे असा डबा दिसत नसल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले.
बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई होणार
शहरातील काही भागात विशेषतः भाजारपेठेत रस्ते, पदपथ अतिशय चांगल्या प्रतीचे बनविण्यात आले आहेत. मात्र, त्यावर कचरा टाकुन शहर विद्रुपीकरण करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. यावर ठोस उपाय योजण्याची गरज आहे. त्यामुळे अशा व्यापारी किंवा नागरिकांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. एखाद्याबद्दल वारंवार तक्रारी असतील तर शहानिशा करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणे शक्य होईल का याचा विचार सुरू असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंट हद्दीत सरकारच्या सूचनेनुसार स्वच्छतेवर भर दिला जात आहे. त्यासाठी व्यापक कार्यक्रम आखण्यात आला आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पत्रके वाटली असून विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी काढुन स्वच्छतेचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी कचरा उचलण्यासाठी कंत्राटदार नेमला आहे. मात्र, स्वच्छतेचे अंतिम उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.
-अभिजीत सानप, मुख्य कार्यकारी अधिकारी
कचरा गोळा करण्यासाठी व्यापार्यांना व नागरिकांना प्लॅस्टिकचे डबे बोर्डाच्यावतीने देण्यात आले आहेत. नागरिकांनी ओला व सुका कचर्याचे घरातच वर्गीकरण करून कचरा गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कचरा उचलण्यासाठी नियमीत घंटागाडीची व्यवस्था उपलब्ध आहे.
-श्रीरंग सावंत, कार्यालय अधीक्षक