मंचर । दिवसेंदिवस साखर व्यवसाय टिकवणे अवघड होऊन बसले आहे. क्विंटलला एक हजार रुपयांचा निव्वळ तोटा साखर कारखान्याला होत आहे. साखरेचे बाजारभाव गडगडलेले आहेत. यंदा आणि पुढील दोन वर्ष साखरेची प्रचंड निर्मिती होणार आहे. त्यामुळे बाजारभाव घसरणीमुळे साखर व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यासाठी माजी केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशातील साखर कारखानदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून साखर व्यवसायातील अडचणींची माहिती दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रेय वळसे पाटील यांचा 20 व्या स्मृतीदिनानिमित्त दत्तात्रयनगर-पारगाव येथे कार्यक्रम रविवारी (दि.13) पार पडला. यावेळी ते बोलत होते.
शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सर्व संचालकांसह विविध मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन राम कांडगे, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, देवदत्त निकम, विवेक वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वर्गीय दत्तात्रय वळसे-पाटील यांनी आपल्या आयुष्यात समाजाच्या उत्कर्षासाठी जीवन व्यथीत केले. त्यांच्या माध्यमातून उजवा कालवा होण्यासाठी तसेच शरद बँकेची निर्मिती शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
साखर कारखानदारीची व्यवस्था पहिल्यांदा कोलमडली
पाटील पुढे म्हणाले की, इतिहासात साखर कारखानदारीची आर्थिक व्यवस्था प्रथमच कोलमडल्याने साखर व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. साखर व्यवसाय सावरण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशातील साखर कारखानदारांचे शिष्टमंडळ लवकरच नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. त्यावेळी साखर कारखानदारीच्या समस्यांची तड लावली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.