बाजारशुल्क न भरणार्‍या हॉकर्सवर होणार कारवाई

0

जळगाव । मनपाच्या किरकोळ वसुली विभागातर्फे शहरातील विविध भागात रस्त्यावर बसून किरकोळ विक्री करणार्‍या हॉकर्स बंधूंसाठी लागू असणारे दैनिक बाजार शुल्क दुप्पट झाल्याने अनेक हॉकर्स हे शुल्क भरत नाहीत. फेब्रुवारी महिन्यात दैनिक बाजार शुल्क वसुलीची आकडेवारी घटल्याने आयुक्तांनी शुल्क न भरणार्या हॉकर्सवर कडक कारवाई करावी, अशा सूचना किरकोळ वसुली विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. त्यानुसार कारवाईचे स्वरूप ठरवले जात आहे.

वसुलीची आकडेवारी निम्म्यावर
फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत उत्पन्नवाढीच्या दृष्टीने दैनिक बाजार शुल्क 10 रुपयांवरून 20 रुपये करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करून तसा ठराव (क्रमांक 670) देखील केला होता. या ठरावानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थायी समितीने प्रशासनाला दिले होते. किरकोळ वसुली विभागाने त्यानुसार अंमलबजावणीला सुरुवातही केली. परंतु, वेळोवेळी आवाहन करुनही हॉकर्स हे शुल्क भरत नसल्याने फेब्रुवारी महिन्यात वसुलीची आकडेवारी निम्म्याने घटली. त्यामुळे ही बाब आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी गांभीर्याने घेऊन शुल्क न भरणार्या हॉकर्सवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सुमारे 10 लाख उत्पन्न अपेक्षित
सुरुवातीला दैनिक बाजार शुल्क 10 रुपये होते. त्यापासून दरमहा साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न महापालिका प्रशासनाला मिळत होते. आता त्यात दुप्पट वाढ झाल्याने प्रशासनाला सुमारे 10 लाख रुपये मासिक उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, शुल्क वाढवल्याने नाराज झालेल्या काही हॉकर्सनी शुल्क भरणेच थांबवले आहे. त्यामुळे वसुलीचा आकडा निम्म्याने खाली आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.