जळगाव । कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार वाढणार असल्याने समितीने भुसावळ महामार्गावर टी टॉवरच्या बाजूला असलेल्या आसोदा शिवारातील 29 एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जमीन खरेदीचे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नियोजन केले आहे. बाजार समितीच्या विस्तारासाठी या महामार्गावर नव्या बायपासच्या बाजूला असलेल्या या जमिनीसाठी बाजार समितीने 10 ते 12 कोटी रूपयांची तरतुद केली आहे. तत्कालीन नगरपालीकेने अधिग्रहीत केलेली ही जमीन सध्या शेतकर्यांच्याच ताब्यात असून ती बाजार समितीकडून खरेदी केली जाणार आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शहरातील गोलाणी मार्केटची जागा मनपाला देवून औरंगाबाद रस्त्यावर नवीन बाजार समितीची उभारणी केली होती.
उत्पन्न वाढीसाठी नियोजन
यावेळी तत्कालीन नगरपालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आसोदा शिवारात टीव्ही टॉवरजवळ 29 एकर जमीन बाजार समितीसाठी राखीव भूखंड म्हणून घोषित केली हाती. याच जमिनीजवळूनट्रीय महामार्गाचा बायपास रस्ता होणार आहे. सध्या शहरात अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या बाजार समितीचा विस्तार करण्यासठी ही जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया बाजार समितीने सुरू केली आहे. ही जमीन खरेदी केल्यानंतर बाजार समितीचा तेथे विस्तार करून सध्या असलेल्या बाजार समितीमध्ये उत्पन्न वाढीसाठी आणखी गाळे बांधण्याचे नियोजन आहे. यापूर्वीच बाजार समितीमध्ये एक व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू आहे. नवीन जागा खरेदी केल्यानंतर ती नव्या महामार्गावर येणार आहे. शेतकर्यांना मोबदला देवून लवकर खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू आहे.