शहादा। कोरोना या साथजन्य विषाणूच्या आजाराने जगभर थैमान घातले असून भारतातही या रोगाचा, आजारांचा उद्रेक होत आहे. याला प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनसह सर्वत्र संचारबंदी केली आहे. परिणामी सर्वसामान्यांचे जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने हाल होत आहेत. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाच्या हमाल मापारी यांना मदत म्हणून बाजार समिती व व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिसराचे नेते तथा श्री सातपुडा साखर साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये सोमवारी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. पाटील यांच्यासह बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, माजी नगराध्यक्ष प्रकाशचंद जैन, सुभाष मोहनलाल जैन, अजय जैन, वर्धमान जैन, मोहनलाल जैन, संदीप पाटील, आदींच्या हस्ते किट वाटप करण्यात आले.
लाँकडाऊन व संचारबंदीमुळे दैनंदिन काम करून उपजीविका भागवणाऱ्या कामगार, हमाल, मापारी यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बाजार समितीतर्फे जीवनावश्यक वस्तू असलेल्या किट वाटपाचा निर्णय परिसराचे नेते दीपक पाटील यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला. शासकीय तसेच सेवाभावी संस्थांकडून सर्वसामान्यांना मदत केली जात आहे. मात्र, बाजार समितीशी संबंधित या कामगारांना सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून व्यापारी व बाजार समिती प्रशासनामार्फत देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगची संपूर्ण दक्षता घेण्यात आली. किट वाटप प्रसंगी बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.