जळगाव – जीवनावश्यक सेवा म्हणून या लॉकडाऊनमधून कृषि उत्पन्न बाजार समिती तसेच भाजीपाला विक्री करणे आदि बाबी वगळण्यात आल्या आहेत. असे असले तरी जीवनावश्यक वस्तुंची विक्री करतांना गर्दी होणार नाही असे आदेश होते.परंतु जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील काही घाऊक व्यापारी हे नागरीकांना किरकोळ स्वरुपातही भाजीपाला विक्री करीत होते. त्यामुळे बाजार समितीत नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याबाबत या व्यापाऱ्यांना बाजार समिती प्रशासनाने वारंवार तसे न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी या बाबींकडे दुर्लक्ष करुन गर्दीस कारणीभूत ठरल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी या व्यापाऱ्यांचा परवाना १४ एप्रिलपर्यत निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आदेश असताना त्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्याने आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी बाजार समितीस भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील यार्डामध्ये हाजी रफीक ईसा बागवान, जोशी ब्रदर्स, प्रोप्रा सदाशिव वेडू जोशी, हबीब खाँ. समशेर खाँ., नाना पाटील अँङ कंपनी प्रोप्रा चंद्रकांत अशोक पाटील, गजानन ट्रेडिंग कंपनी प्रोप्रा आसाराम दामू बावस्कर या अडत्यांची (व्यापारी) परवाने निलंबित करण्यात आले आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन मध्ये विभागप्रमुख वासुदेव सोनू पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.