इंदापूर । इंदापूर कृृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. शेतकर्यांचे कैवारी शरदचंद्र पवार यांचे नाव इंदापूर कृृषी उत्पन्न बाजार समितीला देता येत असेल तर कायदेशीर बाबी तपासून त्यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर कृृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली. इंदापूर कृृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित शरद कृषी महोत्सव 2018 अंतर्गत भव्य कृृषी, पशु व जनावरे प्रदर्शन व घोडे बाजाराच्या समारोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, वैशाली नागवडे, प्रविण माने, प्रताप पाटील, मधुकर भरणे, गणेश झगडे, मदनराव देवकाते, अरविंद वाघ, महारूद्र पाटील, विशाल चव्हाण, नितिन आरडे, गणेश कदम, मोनिका करंदीकर, हेमलता माळुंजकर, रहेना मुलाणी, उमा इंगोले, स्मिता पवार, सुनिता पवार आदी याप्रसंगी उपस्थित होते.
दरवर्षी करणार आयोजन
शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाला बारामती महसूल उपविभागी अधिकारी हेंमत निकम, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, नानासाहेब शेंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हे पशु प्रदर्शन व घोडे बाजार यशस्वी होण्यासाठी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वृृंदाने परिश्रम घेतल्यानेच आम्ही कार्यक्रम यशस्वी करू शकलो व इथून पुढे दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी समारोपाप्रसंगी दिली. राष्ट्रवादी इंदापूर तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी आभार मानले.
डिजीटल इंडियामुळे शेतकरी संकटात
इंदापूरातील घोडे बाजार हा पुणे जिल्ह्यातील पहिलाच बाजार आहे. घोडे बाजार व कृृषी प्रदर्शनातून सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने व त्यांचे सर्व संचालक मंडळाने इंदापूर तालुक्याचे नाव देशात पोहचविले आहे. केंद्र सरकारच्या नेट बँकींग, डिजीटल इंडीयामुळे शेतकरी व सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. प्रत्येक ट्रांझक्शनला बँक पैसे आकारणी करणार असून नवीन चेकबुकसाठी पैसे आकारणी, पैसे बँकेत भरण्यासाठी व काढण्यासाठीही पैशांची आकारणी होणार आहे. हा कष्टकरी शेतकर्यांवर मोठा अन्याय आहे, असे त्यांनी सांगितले. असा कायदा राज्यात लागू होऊ नये यासाठी आमदार दत्तात्रय भरणे व सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी याबाबत आवाज उठवून तो रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सुळे यांनी यावेळी केले. कृषी प्रदर्शन व घोडे बाजार कमी वेळेत भरवून तो मोठ्या प्रमाणात यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार मानले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांचेही अध्यक्षीय भाषण झाले.
शोभा पवार ठरल्या पैठणीच्या विजेत्या
शरद कृषी महोत्सवात सांगलीच्या सुप्रसिद्ध मोनिका करंदीकर यांचा खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा लोकप्रिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी 1.30 वाजता हा कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमास तालुक्यातील महिला व मुलींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या स्पर्धेत तालुक्यातील 48 तरुण व वृृद्ध महीलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढविली. हा कार्यक्रम खास महिलांसाठी असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी देखिल संपुर्ण कार्यक्रमास हजेरी लावून कार्यक्रमाची रंगत वाढविली. शोभा पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणी मिळवली. तर सुषमा गलांडे, सोनम देवकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची पैठणी पटकावली. याबरोबरच घोड्यांचा शो, घोडे नाचकाम, घोड्यांची चाल स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृृतीक स्पर्धा, खाऊ गल्ली, शेतीविषयक चर्चा सत्रे, इंदापूर तालुक्यातील आदर्श 10 महिला बचत गटांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.
विशेष सन्मान
कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे बाजार समितीचे सचिव जीवन फडतरे, उपसचिव वैभव दोशी व इंदापूर डाळींब मार्केटमधे डाळींबाच्या विक्रमी विक्रीबद्दल डाळींब विक्रेते के. डी. चौधरी यांचा यावेळी खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सांस्कृृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व शाळांचाही सत्कार करण्यात आला.