यावल। सर्वसाधारण सभेत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी पालिका प्रतिनिधी निवड करुन पाठविण्याबाबत विषय घेतला असता शिवसेना नगरसेवक दिपक बेहडे यांनी आक्षेप घेतला तर नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी विरोध असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक अतुल पाटीलसह सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षा मनमानी करत असल्याचे सांगत सभात्याग करत आसनावरुन उठल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावल पालिका इतिहासात अद्यापही सभात्याग करण्याचा प्रकार घडला नसल्याचे सांगत मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांना या विषयांवर चर्चा करण्याची विनंती केली. त्यानंतर सर्व नगरसेवकांसह दिपक बेहडे यांनी अतुल पाटील यांच्या नावाला संमती दर्शविली आणि नगराध्यक्षा एकाकी पडल्याचे चित्र सभागृहात पहायला मिळाले.
सभेत 61 विषयांवर चर्चा
पालिका सर्वसाधारण सभा 14 रोजी पालिकेच्या नुतन वातानुकुलीत सभागृहात घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुरेखा कोळी होत्या. यावेळी 61 विषयांवर विचारविनिमय करुन मंजुरी देण्यात आली. सुरुवातीला पालिकेेने नुकतेच बांधलेल्या वातानुकुलीत सभागृहाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला अमरनाथ यात्रेत मृत्यू पावलेल्या भाविकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. शहरातील विविध भागातील प्रस्तावित रस्ते, गटारी, डांबरीकरण, वॉल कम्पाऊंड, स्वागत गेट, पेव्हींग ब्लॉक, एलईडी दिवे बसविणे, खडीकरण, आठवडे बाजार तात्पुरती स्थलांतरण सह 61 विषयांवर चर्चा करण्यात आली.
पथदिवे, ग्रामीण रुग्णालयावर प्रश्न
पालिकेच्या सार्वजनिक दिवाबत्ती खर्चावर बचतीसाठी शहरात लावण्यात आलेल्या एलईडी बल्ब चालू व बंद करण्यासाठी सेन्सरकी टायमर याबाबतही सभागृहात चर्चा करण्यात आली. यावल पालिका ग्रामीण रुग्णालयाकरीता 6 सफाई कर्मचार्यांवर 1 लाख 50 हजार रुपये महिन्याप्रमाणे वर्षाला 18 लाख खर्च करत आहे. त्याचा फायदा काय, असा प्रश्न स्विकृत नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी उपस्थित करत पालिकेने दवाखान्यात कायमस्वरुपी अधिकारी मिळावा यासाठी संबंधित वरिष्ठ विभागास पत्रव्यवहार करण्याबाबत सुचविले. सदर सर्वसाधारण सभेस नगराध्यक्षा सुरेखा कोळी, उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, सर्व नगरसेवक उपस्थित होते.