पालकमंत्री गिरीश बापट : ‘आदर्श व्यापारी पुरस्कारा’चे वितरण
पुणे । सरकारने देशातील व्यापारी व ग्राहकांच्या भल्यासाठीच जीएसटी कायदा लागू केला आहे. यामध्ये काही त्रुटी असून व्यापार्यांकडून येणार्या सूचना विचारात घेऊन भविष्यात उणिवा नक्की दूर करू. राज्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापारी व शेतकर्यांना आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
दि पूना मर्चंटस् चेंबरच्या व्यापार महर्षी उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कारांचे वितरण बुधवारी (दि.6) अण्णाभाऊ साठे सभागृहात गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार मे. पारस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे पेमराज बोथरा, पुणे शहर व जिल्हास्तरीय पुरस्कार पी.एन.गाडगीळ अॅन्ड सन्सचे अजित गाडगीळ व चेंबरच्या सभासदांमधून दिला जाणारा पुरस्कार मे. झुंबरलाल मोहनलाल ललवाणी आणि कंपनीचे झुंबरलाल ललवाणी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले व वालचंद संचेती आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह व शाल देऊन पुरस्कार्थींचा सत्कार करण्यात आला.