औंध । काही वर्षांपासून पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष, अमोल बालवडकर यांनी न्यायालयात केलेली जनहित याचिका व विधारसभेत मांडलेली लक्षवेधी यामुळे पालिकेचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने पाणीपुरवाठा योजनेत अमूलाग्र बदल करून पुढील तीस वर्षांचे नियोजन केले आहे. त्यामुळे बाणेर-बालवाडी येथील ही समस्या येत्या दीड वर्षात संपुष्टात येईल व सोसायट्या टँकरमुक्त होतील, अशी ग्वाही आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली.
बालेवाडी येथे 3 कोटी खर्चाच्या 45 लाख लिटर क्षमतेच्या नवीन टाकीच्या कामाचे भूमिपूजन आमदार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष प्रकाश बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती सकळमकर, वरिष्ठ अभियंता कामत, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रकाश तापकीर, मोरेश्वर बालवडकर, अनिल बालवडकर, शशिकांत बालवडकर आदी उपस्थित होते.
पाच नवीन टाक्या
या भागात एकूण पाच नवीन टाक्या बांधल्याने भविष्यातील पाण्याची समस्या उद्धवणार नसल्याचेही कुलकर्णी यांनी नमूद केले. पाषाण येथे 30 लाख लिटर, ग्रीन झोन सोसायटी बाणेर येथे 35 लाख लिटर, बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथे 30 लाख लिटर, बालेवाडी जकात नाका येथे 30 लाख लिटर व बाणेर येथे 30 लाख लिटर याप्रमाणे टाक्या बांधण्यात येतील, असे कुलकर्णी यांनी सांगितले.