बाणेर रस्त्यावर किरकोळ वादातून एकाचा खून

0

पुणे । चहा पिताना धक्का लागल्याने झालेल्या किरकोळ वादातून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार बाणेर परिसरात सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याचा सुमारास घडला. यामध्ये अन्य एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अफसर खान (वय 20), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सलीम सय्यद हा यावेळी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. हे दोघेही विद्यापीठ ते औंध दरम्यान असलेल्या इंदिरानगर वसाहतीतील रहिवासी आहेत. दोघेही बाणेर रोडवरील सकाळनगर येथील बसस्टॉपजवळ असलेल्या टपरीवजा हॉटेलात चहा पित होते.

यावेळी शेजारी उभ्या असणार्‍या व्यक्तीला त्यांचा धक्का लागला. यातून त्यांच्यात वादावादी झाली आणि हल्लेखोराने त्यांच्यावर कुकरीने वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात अफसर खानचा मृत्यू झाला असून सलिम सय्यद हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.