पुणे : मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवल्याने अन्न, औषध, प्रशासन मंत्री गिरीश बापट यांना मंत्रीपदावर रहाण्याचा नैतिक अधिकार नाही अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्य मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बापट यांचा राजीनामा घेणार? की त्यांनाही क्लीनचिट देणार? असा सवाल अजित पवार यांनी ट्विटर द्वारे प्रतिक्रिया देताना केला आहे. दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी थेट बापट यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे.
दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला त्याचा परवाना बहाल केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बापट यांच्यावर ठपका ठेवला आहे. पदाचा गैरवापर करुन बापट यांनी असे अनेक आदेश पारित केले असे ताशेरेही उच्च न्यायालयाने ओढले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर बापट यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.