बापट प्रकरणात अण्णांना भेटणार – संजय बालगुडे

0
पुणे : रेशन परवाना प्रकरणात औरंगाबाद उच्च न्यायालयाने अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना दोषी ठरविले आहे. या विषयात लक्ष घालून मोठे आंदोलन उभे करावे अशी विनंती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना करणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी दिली.
काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचे बापट यांच्याशी साटेलोटे आहे असा आरोप बालगुडे यांनी प्रसिध्दी पत्रकात केला आहे. पुण्यातील काही नेत्यांचे पालकमंत्री बापट यांच्या सोबत साटेलोटे आहे आणि ते बापटांच्या आदेशानुसारच काम करतात . पुणेकरांना हे उघड गुपित माहीत झाल्याने महापालिका निवडणुकीत पक्षाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत . लोकसभेच्या तोंडावर मतदारांतील गैरसमज दूर होणे गरजेचे असून त्यासाठी बापट यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले पाहिजे, अशी विनंती बालगुडे यांनी पत्रकाद्वारे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात निदर्शने केली परंतु काँग्रेस पक्षाने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही याची नोंद राजकीय वर्तुळात घेण्यात आली आहे.