बापरे…एका दिवसातील मृत्युदरात भारत अमेरिकेच्याही पुढे !

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. दररोज २० हजारापेक्षा अधिक रुग्णांची भारतात नोंद होत आहे. दरम्यान गेल्या २४ तासात झालेल्या मृत्यूने भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. गेल्या २४ तासात ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे, हा मृत्युदर अमेरिकेपेक्षा जास्त आहे. २९ लाख करोनाबाधित रुग्ण असणाऱ्या अमेरिकेत गेल्या २४ तासात २७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जगात फक्त ब्राझिलमध्ये भारतापेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. ब्राझिलमध्ये ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या सात लाखांवर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत २४ हजार २४८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी म्हटले होते. मात्र, सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे देशातील रुग्णसंख्येने सात लाखांचा टप्पा पार केल्याचे स्पष्ट झाले.

आतापर्यंत भारतात १९ हजार ६९३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत १ लाख २९ हजार ९४७ मृत्यूंची नोंद झाली असून ब्राझिलमध्ये ६४ हजार ८६७ मृत्यू झाले आहे. एका आठवड्यापूर्वी ३ टक्के आणि दोन आठवड्यांपूर्वी ३.२ टक्के असणारा भारतातील मृत्यूदर २.८ वर पोहोचला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर अमेरिका, ब्राझिल आणि भारत आहे.