बापाच्या आत्महत्येच्या चिंतेने लेकीनेच मृत्यूला कवटाळले!

0

परभणी : शेतकरी असलेले वडील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतील या भीतीने परभणी, तालुका पाथरी येथील एका 17 वर्षांच्या मुलीने आपले जीवन संपवले. शेतातील पीक जळून गेल्याने 5-6 दिवसांपूर्वीच तिच्या काकांनी आत्महत्या केली होती. वडिलांचेही पीक पूर्णपणे खराब झाले आहे. आपल्या लग्नाच्या खर्चाच्या चिंतेने आता वडीलही आत्महत्या करतील या भीतीने सारिका झुटे या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. राज्य सरकार कर्जमाफीचा गाजावाजा करत असतानाच, राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. आता तर त्यांची मुलेसुद्धा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागली आहेत.

शेतातील पीक जळून गेले
मृत सारिका झुटे ही 12 वीत शिकत होती. तिचे काका चंडिकादास सुरेश झुटे (जवळाझुटा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी) यांनी 3 ऑगस्टरोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वडीलही आपल्या लग्नाचा खर्च करण्यास असमर्थ आहेत हे तिला माहित होते. त्यातच शेतातील पीक जळून गेल्याने तेदेखील आत्महत्या करतील याची भीती सारीकाला वाटत होती. वडीलांनी असे काही करू नये, म्हणून सारिकाने आत्महत्या मार्ग पत्करला. आत्महत्येपूर्वी तिने वडिलांना पत्रात म्हटले आहे की, ताईच्या लग्नासाठी काढलेले कर्ज अजूनही फिटलेले नाही. त्यातच तुम्ही कर्ज घेऊन पिकांसाठी केलेली मेहनतसुद्धा वाया गेली. अशात माझ्या लग्नाचा ताण येऊ नये म्हणून म्हणून मी आत्महत्या करत आहे.

कर्जमाफीच्या लाभापासून अनेकजण वंचित
परभणीच्या पाथरी तालुक्यात दोन महिन्यांपासून पाऊस पडलेला नाही. खरिपाची पेरणी वाया गेली असून, शेतातील पिके करपून जात असल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या कर्जमाफीचा अनेक शेतकर्‍यांना अजूनही लाभ मिळालेला नाही.