चाकण : पत्नीशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून जन्मदात्या पित्याने आठ महिन्यांच्या बाळाचा पाण्यात टाकीत टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाणेकरवाडी (चाकण, ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.19) सकाळी सात वाजता घडला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी नेपाळी पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. चक्र उर्फ राजू सुरत सुनार ( वय 24 वर्षे, सध्या रा. ज्योतिबा नगर, मूळ गाव नेपाळ) असे त्याचे नाव आहे. तर चक्र उर्फ राजू असे दुर्दैवी बाळाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवीण बब्रुवान झुंजार ( वय 29, रा. ज्योतिबा नगर) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त चंद्रकांत अलसटवार आदींनी भेटी देऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.