बापू बिरूः कृष्णेच्या खोर्‍यातील ढाण्या वाघ

0

दृष्टांचा कर्दनकाळ
सह्याद्रीच्या पोटातून वाहणार्‍या कृष्णा आणि वारणेच्या खोर्‍यात अनेक दिग्गजांनी जन्म घेतले. त्यांना ढाण्या वाघ म्हणून संबोधले जायचे. काहींची ब्रिटिश राजवटीत तर काहींची स्वातंत्र्यानंतरची वादळी वाटचाल महाराष्ट्राच्या स्मरणात राहिली. त्यातील एक नाव बापू बिरू वाटेगावकर. अखेरच्या क्षणापर्यंत बापूंचा पश्‍चिम महाराष्ट्रात बोलबाला राहिला. जगण्याचा त्यांचा कॉन्फिडन्स जबरदस्त होता. ताठ मानेने चालणे, माणुसकीला काळिमा फासणार्‍यांना धडा शिकवणे, सन्मार्गाने वागणे हा बापूंचा शिरस्ता होता.

माझ्या लहानपणी माझे वडील कृष्णा आणि वारणेच्या खोर्‍यातील महान हस्तींच्या कथा सांगत. क्रांतीसिंह नाना पाटील, विष्णू बाळा, बापू बिरू वाटेगावकर, अण्णाभाऊंच्या कथेतील फकिरा काहींना सरकारने त्यावेळी दरोडेखोर ठरवले तर काहींना खुनी. त्यातील एक व्यक्तिमत्त्व बापू बिरू वाटेगावकर माझ्या स्मरणात चांगलेच बिंबलेले. बापू बिरूंची उतार वयात तुरुंगातून झालेली सुटका आणि माझ्याच काही मित्रांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखती मला खूप भावल्या. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे या माझ्या मित्राने त्यांची मुलाखत केलेली मला चांगली आठवते. वयाची शंभरी गाठल्या नंतरच नुकताच बापूंनी अखेरचा श्‍वास घेतला. परंतु, अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचा पश्‍चिम महाराष्ट्रात बोलबाला राहिला. जगण्याचा त्यांचा कॉन्फिडन्स जबरदस्त होता. ताठ मानेने चालणे, माणुसकीला काळिमा फासणार्‍यांना धडा शिकवणे, सन्मार्गाने वागणे हा बापूंचा शिरस्ता होता. त्यांच्या आयुष्यावर मराठी सिनेमा निघाला. पोवाडे रचले गेले. तमाशातील वगनाट्यही त्यांच्या कथेवर रंगायचे. तेव्हा त्यांच्या कार्याची दखल सर्वांनी घेतली. धनगर समाजातील एक सर्वसामान्य तरुण म्हणून बापूंचे आयुष्य सुरू होते. बापूंचं गाव वाळवा तालुक्यातील बोरगाव. याच गावातल्या एका गरीब कुटुंबात बापूंचा जन्म. लहानपणापासून कुस्तीची आवड. गरीब माणसांविषयी विलक्षण कळवळासुद्धा. याच बोरगावात रंगा शिंदे गोरगरिबांना त्रास देत होता. गावातील स्त्रियांची भररस्त्यात छेड काढत होता. लोक घाबरत आहेत, म्हटल्यावर रंग्या दिवसेंदिवस उर्मट बनत चालला होता. बापू रंग्याच्या दंडेलीला चिडून होते. गावातील पुढार्‍यांनी बापूला रंग्याचा बंदोबस्त करायला सांगितले. एक दिवस ओव्याच्या कार्यक्रमात बापूंनी रंगा शिंदेला संपवला. रंग्याच्या भावाने रक्ताचा टिळा लावून बापूला खलास करेन, असा पण केला. बापूंच्या कानावर ही बातमी आल्यावर बापू आणि त्यांच्या साथीदारांनी त्या भावाचा आणि त्याच्या मामाचाही कायमस्वरूपी बंदोबस्त केला. त्याची जाण ठेवून अखेरपर्यंत लोक बापूंना भेटले की अश्रू ढाळायचे, आदराने पाया पडायचे. त्यांना आदराने आप्पा म्हटले जायचे. गरिबांना न्याय मिळावा यासाठी बापूंच्या हातून तब्बल बारा खून झाले. बापू पंचवीस वर्षे फरार राहिले. पोलिसांनी बापूंच्या घरच्या लोकांना खूप त्रास दिला, छळ केला. बापूंनी पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, म्हणून खूप प्रयत्न झाले, पण बापू मात्र सह्याद्रीच्या डोंगररांगा, उसाची शेते, दुष्काळी भागातील आडवळणी गावात राहिले. त्यांनी अखेरच्या काळात अध्यात्माचा मार्ग अवलंबला. ते भजन कीर्तनात रंगायचे. ज्यांच्या जाहीर सभेेतल्या भाषणांसाठी गर्दी व्हायची.

बापू बिरूने पोलिसांना चकवा देत 25 वर्षे कृष्णा खोरे पालथे घातले. साथीदारांसह ते कधीही गावात राहत नव्हते. रानामाळात, शिवारात राहायचेे. ज्याच्याकडं जेवायला जायचे, त्याला कधीही अगोदर सांगितले जायचे नाही. अचानक जायचे आणि असल ते खायचे. जिथे जेवायचे तिथे त्यांनी कधी मुक्काम केला नाही. काही वेळा मुक्काम केल्यावर कसंतरी वाटायचे, मग रातोरात ती जागा सोडून दुसरे ठिकाण गाठायचे. घर तर कायमचे तुटले होते. लोकांच्या बळावर इथून पुढचे दिवस काढायचे होते. पहिली गोष्ट ही की, आम्ही चोरी, दरोडा या गोष्टींपासून खूप लांब होतो. या गोष्टी आयुष्यात कधीच जवळ येऊ द्यायच्या नाहीत, असे पक्के केले होते. परस्त्री आम्हाला आई-बहिणीप्रमाणे होती. आमच्याकडे जी माणसं होती त्यात दारू पिणारा कोणी नव्हता. दारू पिणार्‍यांंना थापडी लावून बाहेर घालवत होतो. आमचे सगळे आयुष्य लोकांच्या मायेमुळे पार पडले. लोकांनी खूप लळा लावला, काही आया-बहिणी एकट्या भाकरी घेऊन यायच्या. गावोगावी अशा जीव लावणार्‍या बहिणी मिळाल्या, अशा आठवणी आपल्या मुलाखतीत आप्पा सांगायचे. त्यावेळी ते भूतकाळात हरवायचे. गावाकडील गरीब जनतेवर त्यांचा पुरता विश्‍वास होता. आप्पांशी कोणीही दगाफटका केला नाही. त्यांना सांभाळणारी तीच माणसं होती. त्यांच्यावर खूप मोठा इनाम सरकारने लावला होता. मात्र, आप्पांना पकडून देऊन पैसे मिळवावेत असे कोणालाही वाटायचे नाही. त्यांना वाचवण्यात सामान्य जनतेचा प्रयत्न असायचा. एकदा तर ते राहात असलेल्या उसाच्या फडाजवळ पोलिस पोहचले आणि गुराख्याच्या पोराने उलट रस्ता दाखवून पोलिसांना चकवा दिला.

बापू गरिबांचा आधार आहेत त्यांना जपले पाहिजे, असे सर्वांना वाटायचे, असे अनेक प्रसंग आप्पा सांगायचे. एखाद्याच्या लेकीला सासरचा छळ असायचा. लग्नात हुंडा, मानपान केला नाही म्हणून पोरीला नवरा, सासू, सासरा लय ताप द्यायचे. मारहाण करायची, उपाशी ठेवायची, मग पोरीच्या बापाला कोणीतरी सांगायचे, तू बापूला भेट तुझे काम होईल. मग तो यायचा. रडत सांगायचा. बापू बिरूची टोळी पोरीच्या सासरला रात्री जाऊन भेट द्यायची. त्यांचे नाव त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असायचे. त्यानंतर त्या पोरीचा छळ बंद व्हायचा. अशा कितीतरी पोरींचा छळ त्यांच्यामुळे बंद झाला. पोरींचा छळ झाल्यावर माणसं पोलीस खात्याकडे न जाता बापू बिरूकडे जायची. त्यांच्या टोळीत सामील झालेला प्रत्येकजण काहीतरी अडचणीमुळे आलेला होता. कोणावर गावगुंडांनी अन्याय केलेला तर कोणाची जमीन भावकीतल्या बड्याने लाटलेली. कोणाच्या बहिणीवर अन्याय झालेला. प्रत्येकजण पीडित होता. अशा तरुणांची फौज बापू बिरूकडे जमा झाली आणि कृष्णेच्या खोर्‍यात त्या काळात जरब निर्माण झाली. बापू तत्त्वाने जगायचेे. त्यांनी जे नियम बनवले होते, ते मोडले तर शिक्षा ठरलेली असायची. त्यात कोणाची दयामाया करत नव्हते. त्यांच्या मुलाने काही चुका केल्या, तेव्हा त्या मुलालाही त्यांनी मारले. त्याचीही गय केली नाही. बापू बिरूचा नियम सगळ्यांना सारखा, मग तो कोणीही असो. हे त्यांनी सिद्ध केले. ते म्हणतात, मुलगा माझा लाडका होता हे खरं हाय. पण आम्ही जी माणसं मारली तिबी कुणाची तरी लाडकी हुतीच की, मग आपल्या मुलाला का वेगळी वागणूक द्यायची. त्यो चुकला त्याला शासन केलं. अखेरच्या काळात गेल्या चार वर्षांपासून त्यांना गुडघेदुखीचा आजार झाला होता. त्यांना चालता येत नव्हते. त्यामुळे ते बाहेर फिरायचे बंद झाले. विचारांचा आणि आचारांचा आदर्श घालून देणारे हे वादळ नुकतंच शमलं. पण माणसांच्या मनात घर करून ते नक्कीच राहतील.

– राजा अदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111