पुणे : लाडक्या गणरायाला निरोप देण्याची संपूर्ण तयारी पुण्यातील गणेश मंडळांनी केली असून, पुणेकरदेखील गणरायाच्या निरोपासाठी सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारा वेळ आणि होणारी गर्दी लक्षात घेता, शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख 17 रस्ते बंद सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती विसर्जन शांततेत व लवकर पूर्ण होण्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी केले आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. पुणेसह पिंपरी-चिंचवडमध्येही गणरायाला निरोप देण्यासाठी उद्योगनगरी सज्ज झालेली आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
हे रस्ते राहतील बंद…
पुण्यातील जे प्रमुख रस्ते सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड आणि शास्त्री रोड, बागडे रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, गुरुनानक रोड आणि जेएम रोड यांचा समावेश आहे. या रस्त्यांना जोडणार्या अंतर्गत रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासही मनाई करण्यात आलेली आहे. सकाळी या रस्त्यांवरील वाहतूक बंद केली जाणार असून, विसर्जन संपल्यानंतरच ती खुली केली जाईल, अशी माहिती डीसीपी अशोक मोराळे यांनी दिली. वाहतूक नियोजनासाठी यंदा विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून, वाहन चालकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. मंडईतील टिळक पुतळ्यापासून मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे.
पुणेकरांचा इकोफ्रेंडली बाप्पा मोरया!
गणेश विसर्जनानिमित्त होणारे नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी पुणे महापालिकेच्यावतीने 255 ठिकाणी इकोफ्रेंडली गणपती विसर्जनाची सोय करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी 163 सुसज्ज हौद उभारण्यात आलेले आहेत. या हौदात सरासरी पाच लाख गणपती मूर्त्यांचे विसर्जन होईल, अशी माहिती मनपा अधिकार्यांच्यावतीने देण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ निनादात यावर्षी इकोफ्रेंडली पद्धतीने पुणेकर गणरायांच्या विसर्जनास सज्ज झाले आहेत. गत दोन वर्षांपासून अशा पद्धतीने गणरायांना निरोप देण्यात पुणेकर आघाडीवर आहेत. दरवर्षी सरासरी प्रत्येक हौदात हजार मूर्त्यांचे विसर्जन होते. तर 250 ते 300 मूर्त्या शहरातून वाहणार्या नद्यांत विसर्जित होतात. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नद्यांच्या प्रदूषणात मोठी घट झाली आहे.