पुणे- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गणेशोत्सवानिमित्त आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचे लाडके गणपती बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होत आहे.
पुण्यातील श्री कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारापर्यंत होणार आहे. बुधवारी गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी लोकांची दिवसभर सर्वत्र सुरू होती. विशेषत: दिव्यांच्या माळा, थर्माकॉलची मखर, तोरणे, तसेच अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.