मुंबई । श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासतर्फे आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे सुखरुप विसर्जन करणार्या जलजीवरक्षकांचा प्रत्येकी अडीच लाखाचा विमा उतरवण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशी दिवशी जलजीवरक्षकांवर एखादे संकट आले, तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.
8 ते 10 मंडळांनी केली नोंदणी
सध्या यासाठी 8 ते 10 मंडळांनी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासकडे नोंदणी केली असून, त्यांना गणेश विसर्जनाच्या काळात 40 हजाराची मदत करण्यात येणार असल्याचेही बांदेकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने अनेक रुग्णांसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येते. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीवेळी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने 1400 ते 1500 मुंबईकरांची निवार्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे बांदेकर यांनी यावेळी सांगितले.