बाप्पाच्या आगमणाची तयारी अंतिम टप्प्यात !

0

जळगाव: विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळ्यांनाच लागली आहे. गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. गणरायाचे स्वागत करण्यासाठी अमाप उत्साहात तयारी सुरु आहे. जळगाव गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्तीची कामे जवळपास पूर्ण होत आली आहे. पहिल्या दिवसापासून अकराव्या दिवशीच्या अनंत चतुर्दशीपर्यंत हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाजारात बाप्पाच्या आकर्षित करणाऱ्या मुर्त्या दिसायला लागल्या आहेत. ढोल-ताशा पथकांचा सराव सुरु आहे. महानगरांबरोबरच शहरे आणि खेड्यापाड्यातही गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
गणपती उत्सव म्हटले की, डोळ्यासमोर येते ती गणपतीची देखणी मूर्ती, प्लास्टर, शाडू मातीच्या आकार घेतलेल्या मूर्तींवर सध्या अखेरचा हात फिरवला जातो आहे. सार्वजनिक मंडळांनी विविध भावमुद्रेतील मूर्ती घडविण्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. बाजारात छोट्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्याने आतापासूनच वातावरण गणेशमय झाले आहे. ऐनवेळी उसलारी गर्दी टाळण्यासाठी मूर्ती निवडून बुकिंग केले जात आहे. कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून मंडपबांधणी, देखावा बनविण्यात गुंतले आहेत. चौकाचौकात मोठमोठे मंडप उभे राहत आहेत. देखाव्यांची बांधणी करण्यात येत आहे.

बाजारपेठा फुलल्या
गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साऱ्याच वस्तूंनी जळगावातील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. मखर, फुले, हार, तोरण, गणपतीचे खास दागिने, वाद्ये, विविध शोभेच्या वस्तू आदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. गणपतीच्या आगमनानंतर दोन दिवसांनी गौरीची आगमन होते. त्यामुळे गौरीचे मुकुट, दागिने, वस्त्र आदी वस्तूही बाजारात दाखल झाल्या आहेत. एकूणच बाजारपेठ आता ‘गणेशमय’ झाल्या आहेत.

आकर्षक देखावे
देखाव्यांची तयारी सुरु झाली असून अनेक भागात मंडळांचे तरुण कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. आपल्या मंडळाचा गणपती तसेच देखावा अधिकाधिक आकर्षक व्हावा यासाठी कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. मोठ्या गणेशोत्सव मंडळांचे देखावे काय आहेत? याबाबत चर्चा सुरु आहे. घरगुती गणपती बसवणाऱ्या भक्तांचीही तयारी सुरु आहे.