गुलालाऐवजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली फुलांची उळधण : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भुसावळ- पारंपरिक ढोल-ताशांचा गजर करीत लेझीम खेळत व मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत शहरातील सार्वजनिक गणेशात्सव मंडळांनी साश्रूनयंनानी विघ्नहर्त्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या ! म्हणत निरोप दिला. पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत यंदा डीजेऐवजी पारंपरीक वाद्यांना पसंती देत गुलालाचा अल्प प्रमाणात वापर करीत फुलांची उधळणही केल्याचे सकारात्मक चित्र यंदा दिसून आल्याने शहरवासीयांनी समाधानही व्यक्त केले. विचारांचा वारसा व नव्या बदलाची कास धरलेल्या भुसावळातील सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीत तरुणीदेखील ढोल-ताशे वाजवत असल्याने मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नव्या बदलाची नांदीदेखील दिसून आली तर महिला सक्षमीकरणाचा संदेशही यातून समाजाला मिळाला.
32 सार्वजनिक मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत समावेश
बाजारपेठ हद्दीतील 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार होती मात्र केवळ 32 मंडळे त्यात सहभागी झाले. शहरातील भारत मेडिकलजवळून रविवारी दुपारी 12.30 वाजता श्री विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. हुडको कॉलनीतील साईराम मंडळ मिरवणुकीच्या प्रथम रांगेत असल्याने आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या पदाधिकार्यांचा सत्कार केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.
नव्या बदलाची नांदी : मिरवणुकीत तरुणींचाही सहभाग
स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत शहरातील शिवमुद्रा सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुकीत ढोल-ताशे वाजवण्याची संधी तरुणींनाही देण्यात आली. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर भुसावळातील राबवण्यात आलेल्या या प्रयोगाचे शहरवासीयांनी कौतुक केले. तरुणींचा असलेला मिरवणुकीतील चंचू प्रवेश भविष्यात निश्चितच मोठे रूप घेईल यात शंकाच नाही. शहरातील सराफा बाजारात एरव्ही महिलांच्या उपस्थितीचे असलेले नगण्य प्रमाणात गेल्या दोन वर्षात वाढलेलेही दिसून आले.
एकात्मतेचे दर्शन : मुस्लीम बांधवांनी केला सत्कार
शहरातील सराफा बाजारातील मोठ्या मशिदीजवळ शिवमुद्रा मंडळाचे अध्यक्ष वरुण इंगळे यांचा मुस्लीम बांधवांनी सत्कार केला तसेच मिरवणुकीवर झेंडूच्या फुलांसह गुलाबाच्या पाकळ्यांची उधळणही केली. शिवमुद्रा मंडळासह शहरातील अन्य मंडळांनीही पारंपरीक वाद्यांसह मराठमोठ्या संस्कृतीचे दर्शनही घडवले. मुस्लिम समाजातर्फे गटनेता मुन्ना तेली, आशिक खान शेर खान, साबीर शेख, एमआयएमचे फिरोज खान, शफी पहेलवान, अशरफ तडवी, शकील बागवान, शेख पापा शेख कालू आदींनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांचे प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत करीत एकात्मतेचे दर्शनही घडवले.
आमदार-नगराध्यक्षांनी केले स्वागत
सराफा बाजारातील मुख्य मशिदीजवळ आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह युवा नेतृत्व सचिन संतोष चौधरी यांनी श्री विसर्जन मिरवणुकीचे तसेच पदाधिकार्यांचे स्वागत केले. प्रसंगी उद्योजक मनोज बियाणी, संतोष दाढी, सचिन चौधरी, आऊ चौधरी, जगन सोनवणे, पुष्पा सोनवणे, जी.आर.ठाकूर, रघुनाथ अप्पा सोनवणे, जे.बी.कोटेचा, राजू खरारे, प्रवीणसिंग पाटील, ललितकुमार मुथा यांच्यासह हिंदू-मुस्लीम पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सराफा बाजारात सार्वजणिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी आमदार संजय सावकारे यांनी खांद्यावर घेत नृत्य केल्याने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
तीन ठिकाणी विसर्जन : कडेकोट बंदोबस्त
बाप्पांचे पुलाच्या त्याबाजूने यावल साईडने मोठ्या गणपतींसाठी श्री विसर्जन करण्यात आले तर राहुल नगर व महादेव घाटात घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण ठोंबे, बाजारपेठचे देविदास पवार, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले व कर्मचार्यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले. शहरातील बसस्थानकाचे दिवसभर आरपीडी रोडवरील डी.एस.ग्राऊंडवर स्थलांतर करण्यात आले होते. पोलिसांच्या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत गुलालाऐवजी यंदा मोठ्या प्रमाणावर फुलांची उधळण केली.
नगरसेवक कोठारींचे दातृत्व : केळीसह पाण्याच्या जारचे वाटप
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणार्या नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी श्री विसर्जन मार्गावर गणेश भक्तांना 50 हजार केळीचे वाटप केले तसेच 150 पाण्याचे जार उपलब्ध करून दिल्याने गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमासाठी हिंदू हौसिंग सोसायटीचे सहकार्य लाभले. जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शॉपसमोर तसेच राहुल नगराजवळ पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आले.