बाप्पा पावले; पहिल्याच दिवशी तीनशे क्विंटल कापूस खरेदी

0

धरणगाव । येथील श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहर्तावर श्रीजी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीमधील कापूस खरेदीचा शुक्रवारी 25 रोजी सकाळी शुभांरभ करण्यात आला. खरेदी वेळी नविन कापसाला 5 हजार 501 रूपयांचा भाव देण्यात आला. पहिल्याच दिवशी सुमारे 300 क्विंटल नवीन कापसाची खरेदी झाली. श्रीजी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंगफॅक्टरीमध्ये काटापूजन नयन गुजराथी, जीवन बयस, धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा श्रीजी जिनिंगचे संचालक सुरेश चौधरी व सागर करवा यांच्या हस्ते झाले.

श्री जिनिंगमध्ये दिवसभरात 600 क्विंटलची खरेदी
काटा पूजनानंतर नवीन कापसाचा भाव जाहीर करण्यात आला. कापूस विक्रीचा पहिला मान शामखेडा येथील शेतकरी गोकुळ पाटील यांना मिळाला. दिवसभरात सुमारे 600 क्विंटल कापसाची खरेदी झाली. धरणगाव तालुक्यातील दरवर्षी श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नविन कापूस खरेदीचा प्रारंभ होत असतो व घटस्थापना तसेच दसर्‍यानंतर खरेदीला वेग येतो. गेल्या दोन ते तीन वर्षापासून कापसाला साधारण चार ते पाच हजारपर्यंत भाव मिळत आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभाव देखील कमी असल्याने गेल्या वर्षीही शेतकर्‍यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. मागील सलग दोन वर्ष दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी निलेश चौधरी, प्रवेश गुजराथी, उमेश चौधरी, नरेंद्र भदादे, सोहनलाल, शिवकुमार शर्मा, महेश शर्मा, प्रवीण पाटील, किरण अग्नीहोत्री, गजानन साठे, दिपक पाटील, श्रीकांत पवार, योगेश चौधरी, किशोर महाजन, कैलास लांबोळे, मेघराज चव्हाण यांच्यासह तीन ते चार हजार शेतकरी उपस्थित होते.