मुंबई । मुंबईकरांना लोकल प्रवासावेळी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल याचा काही नेम नाही. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात धावत्या लोकलमध्ये आज चक्क साप आढळल्याने खळबळ उडाली.
ठाणे स्थानकात लोकल आल्यानंतर एका प्रवाशाला लोकलच्या पंख्यात साप असल्याचे आढळून आले आणि डब्यात गोंधळ उडाला. ठाणे स्थानकात काही वेळ लोकल थांबवण्यात आली होती. एक लोकल थांबल्यामुळे पाठीमागे असलेल्या अनेक लोकल गाड्याही लटकल्या आणि मध्य रेल्वे आज नव्या कारणामुळे पुन्हा खोळंबली.
टिटवाळाहून सीएसएमटीला सकाळी 8.33 च्या लोकलमध्ये हा प्रकार घडला. ठाणे स्थानकात प्रवाशाला हा साप दिसल्यानंतर साखळी खेचून लोकल थांबवण्यात आली होती. प्रवाशांनी खबरदारी म्हणून डब्यातील पंखे आणि दिवे बंद केले. रेल्वे अधिकार्यांनी अखेर डब्यातील सापाला बाहेर काढल्यानंतर लोकल पुन्हा रवाना झाली.