बाफना ज्वेलर्समधील साफ्टवेअरचा डेटा हॅक करुन लाखोंची खंडणी मागतिली

0

पत्रकार परिषदेत सिध्दार्थ बाफना यांची माहिती ; सायबर पोलीस ठाण्यात तक्रार

जळगाव : शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समधील 80 संगणकांतील साफ्टवेअरचा डेटा हॅक करत प्रति संगणक 980 डॉलर या प्रमाणे हॅकरने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 80 संगणकांतील सॉफ्टवेअरची किंमत भारतीय चलनानुसार 65 लाख रूपयांच्या जवळपास असून याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, डेटा हॅक केला असला तरी आमची सर्व माहिती सुरक्षित असल्याची माहिती बाफना ज्वेलर्सचे सिध्दार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र चोरी व खंडणीचा प्रकार असल्यानेच पोलिसांकडे तक्रार केली. डेटा कोठून व कोणी हॅक केला हे स्पष्ट झालेले नाही.

याबाबत अधिक माहिती देतांना सिध्दार्थ बाफना यांनी सांगितले की, बाफना ज्वेलर्समध्ये दैनंदिन व्यवहारासाठी बिलींग सॉफ्टवेअर, कस्टमर डिटेल्स, ट्रान्झेक्शन डिटेल्स व टेली इआरपी (अकाउंट विभाग) हे चार विभाग आहेत. 24 नोव्हेंबर रोजी या चारही विभागातील 80 संगणक अचानक बंद पडले. काही वेळाने सिस्टीम पूर्ववत झाल्यानंतर संगणकातील डेटा हॅक झाल्याचे व इनस्क्रीप्ट झाल्याचे लक्षात आले. इनस्क्रीप्ट झालेल्या एका फोल्डरमध्ये प्रति सॉफ्टवेअर 980 डॉलरप्रमाणे खंडणी मागणीची एक नोट पॅड फाईल होती. त्यामुळे हा डेटा चोरी झाल्याचा संशय आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिध्दार्थ बाफना व जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधून झाल्याप्रकाराची माहिती व काही पुरावे सादर केले असून रितसर तक्रार नोंदविण्यात आली आहे. डेटा हॅकमुळे किंचीतशी माहिती गेली आहे, मात्र बॅकअप सुरक्षित असल्याने त्याची नोंदणी आम्हाला पुन्हा करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.