बाबरीप्रकरणी सुनावणी 22 मार्चला

0

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य काही जणांवर बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 22 मार्चला सुनावणी होणार आहे.

अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 13 जणांवर या प्रकरणी प्रारंभी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे या सर्वांवरील हे आरोप वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयांना केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व हाजी महबीब अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबतच्या याचिकांवर सोमवारी न्या. पी. सी. घोष, न्या. आर. एफ. नरीमन यांच्या पीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने वरील संकेत दिले. केवळ तांत्रिक पार्श्‍वभूमीवर या सर्वांना दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने 22 मार्च रोजी पुढील सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.

बाबरीप्रकरणी लखनौ व रायबरेलीच्या न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. या दोन्ही सुनावणी एकाच ठिकाणी का केल्या जाऊ शकत नाहीत, असा प्रश्‍न करत न्यायालयाने या प्रकरणात मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह आणि भाजपासह विहिंपच्या नेत्यांचा समावेश आहे. न्यायालयाने सीबीआयला सांगितले की, 13 आरोपींवर गुन्हेगारी कटाची चार्जशीट दाखल करावी. तसेच दोन वेगवेगळ्या न्यायालयात चाललेली सुनावणी एकाच न्यायालयात का होऊ नये, असा प्रश्‍न केला. त्यावर अशा सुनावणीस सीबीआयने तयारी दर्शवली, तर अडवानी यांच्या वकिलांनी यास आक्षेप घेतला. त्यामुळे 22 मार्चच्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.