लखनौ | राम जन्मभूमि-बाबरी मशीद खटल्यातील मूळ याचिकाकर्ते आणि अयोध्यातील निर्मोही आखाडाचे सरपंच महंत (मुख्य पुजारी) भास्कर दास (वय 88) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. श्वासोच्छवासाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतर, बुधवारी रात्री त्यांना फैझाबादच्या हर्षन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. संस्थानच्या ‘आयसीयू’मध्ये डॉ. अरुण कुमार जायसवाल त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र, शनिवारी पहाटे 3 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यापूर्वीही 2003 आणि 2007 मध्ये त्यांना हृद्यविकाराचा सौम्य झटका आला होता.
निर्मोही आखाड्याव्यतिरिक्त भास्कर दास हे उत्तर प्रदेशातील देवळांचे शहर असलेल्या फैजाबाद जिल्ह्यातील हनुमान गढी आखाड्याचेही महंत होते. त्यांचे पार्थिव हनुमान गढी आखाड्यात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार, अयोध्येत शरयु नदीच्या काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. भास्कर दास यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य महंत रामदास दावेदार म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
1929 मध्ये गोरखपूरच्या रानडीह येथील कर्मठ भागवत पाठक यांच्या परिवारात जन्मलेले भास्कर दास वयाच्या 16व्या वर्षी फैजाबादच्या हनुमान गढी मंदिरात सेवा करू लागले. पूजा-अर्चा, विधींबरोबरच त्यांचे धार्मिक शिक्षणही सुरु होते. 1946 मध्ये ते अयोध्यात आले. राम जन्मभूमी परिसरातील राम चबुतरा या मुख्य धार्मिक स्थळाचे ते मुख्य पुजारी होते. 1959 मध्ये निर्मोही आखाड्याचे त्यावेळचे सरपंच महंत रघुनाथ दास यांनी संपूर्ण राम जन्मभूमी परिसराचा ताबा मिळावा म्हणून दावा दाखल केला. या दाव्यात राम चबुतऱ्याचे पुजारी असलेले महंत भास्कर दास हेही वादी झाले. 1959 च्या त्या खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 30 सप्टेंबर 2010 रोजी निर्णय दिला. त्यानंतर महंत भास्कर दास यांनी संपूर्ण रामजन्मभूमी परिसराचा ताबा मिळावा म्हणून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली. हा खटला अजूनही सुरु आहे.
दोन्ही मूळ याचिकादार मित्रांचे निधन
राम जन्मभूमी – बबारी मशीद खटल्यातील हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही मूळ याचिकादारांचे आता निधन झाले आहे. अयोध्यातील बाबरी मशिदीचा दावा सांगणारे सर्वात जुने याचिकाकर्ते हाशिम अन्सारी यांचाही जुलै 2016 मध्ये वयाच्या 95 व्या वर्षी, हृदयविकाराच्याच झटक्याने मृत्यू झाला होता. या खटल्यात दास-अन्सारी हे वाडी-प्रतिवादी म्हणून एकमेकांविरोधात आले तरी त्यांची मैत्री अयोध्येत चर्चेचा विषय होती. हिंदू-मुस्लीम एकतेचे अनोखे उदाहरण म्हणून या दोघांच्या संबंधांकडे पाहिले जाई. न्यायालयात इतका वादग्रस्त खटला लढत असतानाही त्यांनी व्यक्तिगत संबंध कधी कटू होऊ दिले नाहीत. दोघांनीही अयोध्येत एकमेकाच्या धार्मिक कार्यक्रमात कधीही हस्तक्षेप केला नाही की अडथळे आणले नाहीत.