बाबाचा पाय आणखी खोलात!

0

पंचकुला/रोहतक : बलात्कारी बाबा रामरहीमच्या डेर्‍याच्या व्यवस्थापन समितीचा माजी सदस्य रणजीत सिंह आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती खूनप्रकरणाची पंचकुला सीबीआय न्यायालयात विशेष न्यायाधीश जगदीप सिंग यांच्यापुढे शनिवारी सुनावणी झाली. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने पंचकुलामध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवला होता. या दोन्ही प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि साध्वी बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेला रामरहीम आरोपी आहे. सुरक्षेच्या कारणामुळे तो सुनारिया जेलमधूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीस हजर होता. त्याच्यासोबत आणखी सात आरोपींना हजर करण्यात आले होते. रणजीत सिंग खूनप्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी तर पत्रकार छत्रपती यांच्या खूनप्रकरणाची सुनावणी शुक्रवार, 22 सप्टेंबरला होणार असल्याचे न्यायालयातील सूत्रांनी सांगितले.

अंतिम सुनावणीसाठी विलंब
अंतिम सुनावणीसाठी आणखी काही वेळ लागणार आहे. बाबा रामरहीमच्या माजी चालक खट्टा सिंग याने न्यायालयात अर्ज केला असून, नवीन जबाब नोंदविण्याची विनंती त्याने केली आहे. त्याचा अर्जावर पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येईल. खट्टाने यापूर्वी बाबा रामरहीमच्या बाजूने जबाब दिला होता. परंतु, दबावाखाली आपण तसे केल्याचे त्याचे म्हणणे आहे. दरम्यान, बाबाची सहकारी फरार हनीप्रीतचा चालक प्रदीप यास राजस्थानमधील लक्ष्मणगड येथे अटक करण्यात आली आहे. तो सालासार येथे लपून बसला होता. रामरहीमला पंचकुला सीबीआय कोर्टाने 25 ऑगस्ट रोजी दोन साध्वींच्या बालात्कार प्रकरणी दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

रामचंद्र छत्रपती खूनप्रकरण
छत्रपती यांनी त्यांच्या सांय दैनिकात डेरातील कृष्णकृत्य सर्वप्रथम प्रकाशित केले होते. डेर्‍यातील साध्वींच्या बलात्कार प्रकरणालाही छत्रपती यांनीच वाचा फोडली होती. रामरहीम विरोधात बातम्या आल्यानंतर दोन भाडोत्री गुंडांकडून 24 ऑक्टोबर 2002 रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. एका आरोपीला जागेवरच पकडण्यात आले तर दुसर्‍याला नंतर पकडण्यात आले. 21 नोव्हेंबर 2002 रोजी छत्रपती यांचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या प्रकरणात रामरहीम आरोपी आहे.

रणजीत खूनप्रकरण
रणजीत हा डेर्‍याच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य होता. तो रामरहीम यांच्या जवळचा असल्याने त्याला रामरहीम याचे सारे कारनामे माहित होते. त्याचा 10 जुलै 2003 मध्ये खून करण्यात आला. रामरहीम या प्रकरणातही आरोपी आहे.