हनीप्रितविरोधात देशद्रोहाचे गुन्हे, लुकआउट नोटीसही जारी
नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा आश्रमाचा प्रमुख आणि दोन साध्वींवरील बलात्कारप्रकरणी कारागृहात डांबण्यात आलेल्या गुरुमीत रामरहीम सिंग याची कथित दत्तक मुलगी हनीप्रित हिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती विदेशात पळून जाण्याची शक्यता पाहाता, तिच्याविरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांनी सिरसासह अनेक ठिकाणी छापेमारी केली. गुरुमीत याला शिक्षा ठोठावल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामागे हनीप्रित हिचेच डोके होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रवक्त्याविरोधातही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने शिक्षा ठोठावताच गुरुमीत याला पळवून नेण्याचा कटही हनीप्रित हिने रचला होता. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेने तो उधळला गेला होता.
गुरुमीतसोबत हनीप्रितचे लैंगिक संबंध?
गुरुमीत रामरहीम सिंग याला 20 वर्षांची शिक्षा होताच हनीप्रित ही गायब झाली आहे. गुरुमीत आणि हनीप्रित यांचे लैंगिक संबंध असल्याचा आरोपही तिच्या पतीने केला होता. तर हनीप्रित ही पतीला सोडून सदैव गुरुमीत याच्यासोबतच सावलीसारखी राहात होती. ती दत्तकपुत्री असल्याचे सांगितले जात आहे. हनीप्रित हिने गुरुमीत याच्या चित्रपटातही काम केलेले आहे. त्याला जेव्हा पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हाही ती गुरुमीत याच्यासोबत होती. तसेच, त्याला रोहतक कारागृहात हेलिकॉप्टरद्वारे नेतानाही ती त्याच्यासोबत होती. डेरा सच्चा सौदाची उत्तराधिकारी म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. हरियाणातील फतेहाबाद येथे राहणारी हनीप्रित सद्या गायब झालेली असून, तिच्याविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच, गुरुमीत याला पोलिसांच्या तावडीतून पळवून नेणे, हिंसाचाराला उत्तेजन देणे आदी गुन्हेही तिच्याविरोधात दाखल असून, पोलिस तिचा कसून शोध घेत होते. डेरा सच्चा सौदा आश्रमातही पोलिसांनी छापेमारी केली.