बाबाला पळवून नेण्याचा कट फसला

0

पंचकूला । बलात्कार प्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेला गुरमित राम रहिम याला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट फसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम रहिम यांचे खासगी अंगरक्षक न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना पळवून नेणार होते. सातजणांकडून तसा प्रयत्नही झाला. यातील पाचजण हरयाणा पोलीस दलातील होते. तर इतर दोनजण खासगी सुरक्षा रक्षक होते. पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाचजणांनी राम रहिमला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय खासगी सुरक्षा रक्षक असलेले प्रितम सिंह आणि सुखबीर यांचादेखील यामध्ये सहभाग होता. मात्र तेथील इतर पोलिसांना या कटाचा सुगावा लागल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र कट उधळला गेल्यानंतर संबंधित व्यक्तींनी काहीजणांना फोन केले. याच फोननंतर हरयाणात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली. या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने सविस्तर वृत्त दिले असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

श्रध्देच्या नावावर हिंसाचार नको- पंतप्रधान
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून हरियाणातील हिंसाचारावर भाष्य केले. धर्म आणि श्रद्धेच्या नावावर कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच कायदा हातात घेणार्‍यांना शिक्षा ठोठावण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी केला. ते म्हणाले की, भारत हा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश आहे. त्यामुळे धर्म आणि श्रद्धेच्या नावावर किंवा राजकीय कारणाने कायदा हातात घेऊन होत असलेली हिंसा खपवून घेणार नाही. कोणत्याही पंथाने, समूहाने केलेली हिंसा कोणतंही सरकार खपवून घेणार नाही. सर्वांना कायद्यासमोर झुकावेच लागेल. दोषींना कायदा शिक्षा देईलच, असं मोदी म्हणाले.

बाबाचे भाडोत्री गुंड
बाबा राम रहीमला 2002 च्या साध्वी बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. यानंतर सिरसा, पंचकुला या शहरांसह हरियाणा, पंजाबमध्ये राम रहीमच्या कथित समर्थकांनी धुडगूस घातला. यात भाडोत्री गुंडांना पैसे देऊन बाबाच्या भक्तांनी पाचारण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी प्रत्येकाला हजार रुपये देऊन तोडफोड करण्यास सांगण्यात आले होते. यासाठी पैशांसोबत त्यांच्या खाण्या-पिण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आल्याची धक्कादायक बाबदेखील समोर आली आहे. कारण हिंसाचार करतांना आपली ओळख पटू नये म्हणून गुंडांनी आपल्या चेहर्‍याला रूमाल लावल्याचे अनेक ठिकाणच्या सीसीटिव्ही फुटेजमधून दिसून आले आहे. हे काम सराईत गुंड करत असतात. यामुळे या अनुषंगाने आता पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून काही जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

राम रहीम लादेनपेक्षाही धोकेदायक !
कुख्यात बलात्कारी बाबा राम रहीम याच्यावर चौफेर टीका होत असतांना आपल्या क्रांतीकारी प्रवचनांसाठी ख्यात असणारे मुनीश्री तरूणसागर यांनीही त्यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांनी तर राम रहीम यांची तुलना ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याशीच केली आहे. ओसामा बिन लादेन या दहशतवाद्यापेक्षाही बाबा राम रहीम हे धोकादायक आहेत असं वक्तव्य जैन मुनी तरूण सागर महाराज यांनी केलं आहे. लादेन सारखे दहशतवादी हे काही लोकांची हत्या करतात पण बाबा राम रहीमसारखे लोक हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची हत्या करतात. त्यामुळेच हे असले लोक एखाद्या कुख्यात दहशतवाद्यापेक्षाही जास्त धोकादायक आहेत असे तरूण सागर महाराज यांनी म्हटले आहे. राम रहीमसारखे लोक हे लादेनपेक्षा धोकादायक आहेत, त्यांना शिक्षा होणे योग्यच आहे. न्यायव्यवस्था आपले काम योग्य पद्धतीने करते आहे आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया तरूण सागर महाराज यांनी दिली आहे.

चुका टाळण्याचा प्रयत्न
दरम्यान, सोमवारी राम रहीम याला कारागृहातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावली जाणार आहे. याची तीव्र प्रतिक्रिया उमटू नये म्हणून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. आधीच्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यात येत असून प्रशासनातर्फे सतर्कता बाळगण्यात येत आहे. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून बहुतांश बाबा भक्तांनी काढता पाय घेतल्यामुळे सोमवारी बाबाला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर याची फारशी तीव्र प्रतिक्रिया उमटणार नसल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र असे असले तरी पंचकूलासह हरियाणा आणि पंजाबमधील अन्य शहरांमधले त्याचे भक्त उत्पात घडवू शकतात. यामुळे प्रशासनातर्फे योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.