कल्याण । छत्रपती शिवाजीमहाराजांनी 18 पगड जातींना एकत्र आणून त्यांचा उद्धार केला, तर बाबासाहेबांनी दीन-दुबळ्यांना जगण्याचे सामर्थ्य दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य इतके महान आणि भावी पिढ्यांना प्रेरणादायी आहे, की त्यांची अनेक स्मारके उभारली तरी कमीच आहेत, अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या 10 फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते जयंतीच्या पूर्वसंध्येला झाले. यावेळी ते जमलेल्या डोंबिवलीकरांसमोर बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, नागपूरहून आलेले बौद्ध भिक्षुक-भन्ते, आमदार सुभाष भोईर, स्थायी सभापती राहुल दामले, सदानंद थरवळ, रमेश जाधव, राजेश मोरे, मंदार हळबे, रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड, बसपचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर आदी समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
या पुतळ्याच्या उभारणीस आवश्यक परवानगी मिळाली, की नाही याबाबत शहरात चर्चा होती. परंतु, कायद्याच्या निर्मात्याच्या पुतळ्यास कायदा कसा आड येईल, असे सांगत शिंदे यांनी या विषयावर पडदा पाडला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी विशेष प्रक्रिया करुन शुद्ध करून लवकरच चवदार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती आपल्या भाषणात दिली. 25 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले, हाच अनुयायांसाठी सुदिन आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा महापलिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या शेजारी लवकरात लवकर बसवावा, या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी गायकवाड यांना आश्वासन देण्यात आले होते. त्यांची पूर्तता होत असल्याने सर्व डॉ. आंबेडकर अनुयानी जयंतीदिनी आनंदोत्सव साजरा करतील, असे सांगून गायकवाड यांनी पालकमंत्री शिंदे आणि राज्यमंत्री चव्हाण यांचा सत्कार केला.