बाबासाहेबांचे निवासस्थान सुशोभीकरणास एक कोटी

0

वडगाव मावळ :तळेगाव दाभाडे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाची डागडुजी व सुशोभीकरणासाठी एक कोटी रूपये आणि देहूरोड येथील धम्मभूमी परिसराचे सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यासाठी 50 लाख रूपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

…धम्मभूमीचाही विकास
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे व स्थळांचा विकास करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. डॉ.आंबेडकरांनी 1948च्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ सुरू करण्यासाठी 85 एकर जागा व तळेगावला बंगला विकत घेतला होता. तेथे राज्यघटनेचे काही अंशी लिखाण झाले आहे. डॉ. आंबेडकर यांनी धर्मांतरापूर्वी देहूरोड येथे विहारामध्ये स्वहस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना केली होती. नागपूरची दीक्षाभूमी, दादरची चैत्यभूमी याप्रमाणे या पवित्र ठिकाणास धम्मभूमी म्हणून संबोधतात. या ठिकाणांचे महत्त्व लक्षात घेऊन आमदार भेगडे यांनी निधीसाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.