बाबासाहेबांचे विचार अतिशय प्रेरणादायी

0

मुंबई (प्रतिनिधी) – समताधिष्ठित भारत घडविण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार अतिशय महत्त्वपूर्ण, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. इंदू मिलमध्ये उभारण्यात येणार्‍या युगपुरुष डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे हिच त्यांना खर्‍या अर्थाने आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी ‘त्रिशरण पंचशील’ म्हणण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस पोलीस पथकाद्वारे शासकीय मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, आमदार भाई गिरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संविधानामुळे सर्वांना दिशा मिळाली
मुख्यमंत्री श्री.फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आपल्या सर्वांना एक दिशा मिळाली आहे. त्या संविधानाचे अनुकरण आपण सर्वंजण करतो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मार्गांचे पालन करून आपण पुढे जात आहोत. डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेला ’प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ जरी 1923 मध्ये लिहिला असला तरी तो आजच्या काळात निश्चितच उपयोगी पडणारा आणि आजच्या घडीशी सुसंगत आहे.

युगप्रवर्तक पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र जाधव यांनी इंग्रजी अनुवाद केलेल्या ’युगप्रवर्तक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विविध पैलू विषयी माहिती देणारे कॉफी टेबल बुक छायाचित्र प्रदर्शनाला यावेळी श्री. फडणवीस आणि उपस्थित सर्वांनी भेट दिली.

बाबासाहेबांचे विचार आजही मार्गदर्शक
महिलांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्वातंत्र आणि स्थैर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आहे. स्वातंत्र्यानंतरही देशाला बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी ठरत आहेत, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रीमती मुंडे यांनी पुष्पअर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून समाजात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय प्रगती घडवून आणली. समाजातील दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणले तसेच महिलांसाठीचे त्यांचे कार्य फार मोलाचे आहे. आज महिलांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून, भविष्यातही मार्गदर्शक ठरतील.