खासदार अमर साबळे यांचे विचार
रावेत : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी आहेत. त्यांच्या विचारांना एका चौकटीत बसवू नये. लोकशाही रुजविण्यापासून ते जाती अंतापर्यंत सर्वांगीण शिक्षणापासून ते समानतेच्या विचारापर्यंत प्रत्येक विचारात डॉ. आंबेडकर यांचे प्रतिबिंब उमटले आहे. त्यामुळे त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्या. बाबासाहेबांच्या विचारात तलवारीच्या धारेप्रमाणे ताकत आहे. या विचारांची रुजवणूक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत होणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या विचारातून सामाजिक व राजकीय परिवर्तन घडविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी केले. वाल्हेकरवाडी येथील बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी चौकात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यकमात ते बोलत होते.
राज्यघटनेची मूल्ये रुजवली पाहिजे
बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज तोरडमल यांनी प्रास्ताविकात म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना ही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नाही तर ती सर्वव्यापी आणि परिपूर्ण आहे. त्यांनी घडविलेल्या या राज्यघटनेचे आपला देश नाही तर जगातील इतर देशही अनुकरण करत आहेत. त्यांनी कधीही एका विशिष्ट वर्गाचा विचार केला नाही. सर्वसमावेशक भूमिकेतून त्यांनी राज्यघटनेचा विचार केला. या राज्यघटनेतील मूल्ये जीवनात आपण रुजविली पाहिजेत. मानव सेवा, त्यांचा आदर करणे आणि माणसाला माणसाशी जोडणे हा विश्वास डॉ. आंबेडकर यांनी रुजवला.
या प्रसंगी भाजपा माजी शहर अध्यक्ष सदाशिव खाडे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, स्थायी समिती सदस्या करुणा चिंचवडे, माऊली थोरात, बाबू नायर, शेखर चिंचवडे, सलीम शिकलगार, सचिन शिवले, प्रल्हाद सुधारे, सुनील सोनवणे, अनिता सोनवणे, नीता परदेशी, हेमंत ननावरे, बुद्धीसागर आठवले, दीपक तोरडमल, शेषेराव लोमटे आदी उपस्थित होते. यावेळी प्राधिकरणातील उद्योजक राजेंद्र सोनवणे यांना प्रतिष्ठानचा बहुजन मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. फुले पगडी, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समर्थक शिंदे यांच्या भीमबाणा गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण चौधरी यांनी केले. मानपत्राचे वाचन शुभांगी शिंदे यांनी केले तर आभार अतुल क्षीरसागर यांनी मानले.