बाबासाहेब व बापूंची पत्रकारिता

0

खरं तर बाबा व बापू ही प्रचलित समाजातील व्याप्त परंतु महत्वपूर्ण शब्द श्रृंखला …..बाबा अथवा बापू म्हणजे वडीलधारी व्यक्ती ……जी हात पकडून आपल्याला व्यावहारिक जगतातील सद्गुण शिकवितात…

बाबासाहेब आंबेडकर व मोहनदास गांधी ही विसाव्या शतकातील महत्वपूर्ण ज्यांनी इतिहासातील सुवर्ण पाने आपल्या दूरदृष्टी व समाजाप्रती असलेल्या भूमिकेतून सर्वांसाठी खुली केली. त्यामुळेच गांधी बापू म्हणून तर आंबेडकर बाबासाहेब म्हणून सर्वांसाठी आदरणीय आहेत. विसाव्या शतकातील प्रारंभाच्या दुसज्या दशकात टिळक युग अस्त पावले व गांधी युग भारतात आले. आणि दुसरीकडे बाबासाहेब मुक जनांचे नायक ठरले. बाबासाहेबांनी पत्रकारिता आरंभ केला त्याला कारण आहे. 1917 मध्ये सरकारने साऊथबरो कमिशन जी जातीजमातीची मताधिकार विषयक चौकशी करण्याकामी नेमली होती. त्यात स्वातंत्र्याची प्रखर मागणी कमिशनच्या लक्षात आले. कारण ब्रिटिशांनी लादलेली विविध प्रकारची शोषण व्यवस्था …..त्यावेळी साक्ष देणाज्या वि.रा. शिंदे, नारायणराव चंदावरकर यांच्या साक्षी झाल्या. त्यांना असे वाटले नाही की अस्पृश्यांना स्वतंत्र्य प्रतिनिधीत्व द्यावे त्यांचे न्याय हक्क मांडावे. त्याउपर समाजातील उच्च प्रतिनिधींच्या हाती सर्व सोपवावे असे त्यांचे मत होते. यावेळी डॉ.बाबासाहेब यांना साक्षी करता बोलावले नव्हते. त्यावेळी बाबासाहेब सिडने हॅम कॉलेजला प्राध्यापक होते. त्यांचा कुठल्याही सामाजिक संस्थेशी संबंध नव्हता परंतु अस्पृश्यांची गडचेपी होईल. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित व्हावे लागेल याची कल्पना डॉ.बाबासाहेबांना होती. त्यामुळेच त्यांनी गर्व्हनरशी पत्रव्यवहार केला. आणि त्यांची साक्ष नोंदविली गेली. वि.रा.शिंदे यांनी साक्ष देतांना ज्यांचे वार्षिक उत्पादन 144 रू.आहे. अशा अस्पृश्यांना मतदानासाठी पात्रता सुचविली होती. याउलट बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघासाठी मागणी केली. व त्या सोबत अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या बरोबर अस्पृश्यांना मतदार संघात स्थान द्यावे असे सांगितले. त्यावेळी महाराष्ट्रात अस्पृश्य समाजाला व त्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडणारी वृत्तपत्रे वा पाक्षिके नव्हती. त्यामुळे 31 जानेवारी 1920 रोजी मुकनायक पाक्षिकाचा उदय झाला आणि मुक समाजाच्या मुक संवेदना व त्यांच्या मुक्ती संग्रामाचा बिगुल वाजला. डॉ.बाबासाहेब सिडने हॅम महाविद्यालयात असल्याने पांडुरंग भटकर हे संपादक होते.

रानडेंच्या शिष्यत्वाखाली गांधीनी भारत भ्रमण करून समाजातील व्याप्त प्रश्‍नांना समजून ते मांडण्यासाठी भारतात परतल्यावर 1915 मध्ये नवजीवन, यंग इंडिया तसेच हरिजन चे संपादन केले. यापूर्वी गांधींनी आपल्या पत्रकारितेला दक्षिण आफ्रिकेत असतांना इंडियन ओपीनियन पासून सुरवात केली होती. गांधी हे अनुकूल परिस्थितीत तर आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेत गांधींना आलेल्या भेदाची त्यांच्या सामाजिक कार्यात आणि टॉलस्टाय यांच्या लिखाणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तर दुसरीकडे बाबासाहेब प्रतिकूल परिस्थितीत त्या काळी असलेल्या सामाजिक रचनेमुळे अगदी शिक्षणाच्या पहिल्या पायरीपासून तर बॅरिस्टर होऊन आल्यानंतर देखील समाजातील उच्चनीच्चतेच्या ज्वाळा त्यांनी अनुभवल्या. त्यामुळेच मुकनायक पाक्षिकात त्यांनी सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडली. मुकनायकात बाबासाहेबांनी एकूण 14 लेख लिहिले. ज्यावेळी मुकनायकाची सुरुवात झाली. त्यावेळी लोकमान्य टिळक हयात होते. आणि त्यांचे केसरी वृत्तपत्र प्रसिध्द होत होते. यामध्ये मुकनायकाची जाहिरात लावण्यास टिळकांनी नकार दर्शविला. यावरून स्वातंत्र्याच्या लढ्यात अग्रभागी असणारे टिळक देखील समाजकारणापेक्षा राजकारणात अधिक सक्रिय होते. त्यावेळी आगरकरांसोबत आधी राजकीय स्वातंत्र्य नंतर समाजसुधारणा असा त्यांचा मानस होता. त्यामुळेच आगरकर व टिळकांमध्ये वैचारिक वाद होता.

मुकनायकाच्या पहिल्या अंकात आपली भूमिका मांडतांना डॉ.बाबासाहेब लिहितात की, आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाज्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खज्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भुमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात नियत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातींच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अश्या वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवगत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाज्या उतारूने जाणूनबूजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाज्या जातीचेही नुकसान होणार यात बिल्कुल शंका नाही. म्हणूनच स्वहित साधु पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढत मुर्खाचे लक्षण शिकू नये. डॉ.बाबासाहेब आपल्या पहिल्याच लेखात समाजातील सत्यकथन करतांनाच वृत्तपत्रीय नीतिमुल्यांची जाण पत्रकारांना करून देतात आणि स्वार्थाने सुरु झालेली व हीत सामावलेली वृत्तपत्रे समाजाचे नुकसान करतील असे सुतोवाच करतात. मुकनायकाचा प्रवास 5 जुलै 1920 नंतर बाबासाहेब लंडनला पुढील अभ्यासासाठी गेल्याने मुकनायकच्या व्यवस्थापकीय मंडळाने त्यात फारसा रस न घेतल्याने रेंगाळले. यानंतर 3 एप्रिल 1927 ला बहिष्कृत भारत पाक्षिक उदयास आले. त्यानंतर 24 नोव्हेंबर 1930 रोजी जनताचा पहिला अंक प्रकाशित झाला. 31 ऑक्टोबर 1931 रोजी त्याचे साप्ताहिकात रूपांतर झाले.

(क्रमश:) बाबासाहेब यांच्या पत्रकारितेचे युग या आगामी पुस्तकातील अंश

– संदिप केदार
(लेखक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद व पत्रकारिता विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)